Tuesday, March 14, 2017

मिनिमलिझमची भारतीय मुळं

“You may have occasion to possess or use material things, but the secret of life lies in never missing them.” ~Gandhi

बुद्ध आणि गांधी यांच्या विचारांशी परिचय असलेल्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला कमीतकमी वस्तुंचा संचय, काटकसर, पुनर्वापर, साधी रहाणी या मिनिमलिझमच्या मुलभूत संकल्पना जवळच्या वाटल्या तर नवल नाहिच. 
मात्र मिनिमलिझम हे हल्लीच्या काळातले एक पाश्चात्य, अती समृद्धतेमधून आलेले खूळ आहे, आणि विशेषत: इथली बहुसंख्य जनता अजूनही अभावाच्या छायेखाली जगत असताना काही मोजक्या, शहरी नवसमृद्ध लोकांनी हे मिनिमलिझमचे खूळ डोक्यावर घेणे हा एक फ़ार मोठा उपहास आहे असं वाटणारेही अनेक आहेत. 
त्यांच्याकरता मिनिमलिझमची भारतीय मुळं नेमकी काय आणि त्यांचा सामान्य, गरीब, मध्यमवर्गीय भारतीयांच्या जगण्याशी काय संबंध आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

अती समृद्धता आणि अभाव यांच्या राहणीमानामधली दरी कधीच सांधली जाणार नाही हा भ्रम बुजवण्याचे सामर्थ्य काही अंशी असलेच तर फ़क्त मिनिमलिझम विचारसरणीमधेच आहे. हे ओळखूनच महात्मा गांधींनी साधेपणा आणि कमीत कमी जीवनावश्यक वस्तुंच्या राहणीतून केवळ भौतिकच नाही तर मानसिक, वैचारिक मिनिमलिझमचा जो पाया घालून दिला आहे तो आजच्या सर्व मिनिमलिझमचा आदर्श आहे
तणाव-मुक्त जगण्याची गुरुकिल्ली साध्या, सोप्या जीवनशैलीमधे आहे हे त्यातूनच पहिल्यांदा जगापुढे आले.

अल्टीमेट मिनिमलिस्ट म्हणून गांधींचे नाव आजचे अनेक आधुनिक मिनिमलिस्ट आदराने घेतात ते त्याकरताच.  

मृत्यूनंतर म.गांधींच्या खाजगी मालमत्तेमधे त्यांचे रोजच्या वापरातले घड्याळ, चष्मा, चपला आणि जेवणाचा वाडगा इतक्याच गोष्टींचा समावेश होता ही गोष्ट त्यांच्या वागणुकीतला आणि विचारांमधला साधेपणा, अल्टीमेट मिनिमलिझम सिद्ध करायला पुरेशी आहे.

आपल्या आधुनिक जीवनशैलीला अनुसरुन या तत्वांची मांडणी नव्याने करण्याचे श्रेय मात्र जोशुआ आणि लिओ बबुता सारख्या पाश्चात्य ब्लॉगर्सचे. त्यांनी सुरु केलेल्या या मिनिमलिझम ब्लॉग साखळीत आपल्या पौर्वात्य, बुद्ध-गांधी तत्वद्न्याचा वारशातून आलेल्या विचारांचा नव्या मिनिमलिझमशी मेळ सांधणारा एका तरुण भारतीय ब्लॉगर आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसतो. 

’द इंडियन मिनिमलिस्ट’ अशा नावाचा हा ब्लॉग चालवतो हार्दिक नागर हा केवळ १९ वर्षे वय असलेला, कॉमर्स कॉलेजात शिकणारा एक भारतीय तरुण मुलगा. लिहिण्याची, तत्वद्न्यानावरची पुस्तके वाचण्याची आवड असणारा हार्दिक आयुष्याचा नेमका अर्थ शोधण्याची धडपड करत असतो आणि त्याकरताच शिक्षण चालू असताना तिस-या जगातल्या गरिब, दारिद्र्यरेषेखाली जगणा-या देशांमधे काम करणा-या एका आंतरराष्ट्रीय एनजिओसोबत काम करतो.

मिनिमलिझमवरचे ब्लॉग्ज वाचत असताना हार्दिकला या संकल्पनेमागची भारतीय मुळे दिसायला लागली होती. त्यामुळेच कितीही कपाटे आवरली, नव्या वस्तुंच्या खरेदीवर संयम ठेवला, अडगळ दूर करण्याचे सर्व उपाय योजले तरी मुळात जोवर आतून हे विचार आपल्यात रुजत नाहीत तोवर डी-क्लटरिंगचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत, भारतीय तत्वद्न्यानाला अनुसरुन बदल आतून बाहेर व्हायला हवा. आधी बाहेरचं आणि मग आत असं शक्य होत नाही हे लक्षात आल्यावर त्याने आपले प्रयत्न त्या दिशेने सुरु केले आणि मग आपल्या अनुभवांवर लिहायला सुरुवात केली.

मटेरिअलिझम आणि अती ग्राहकवादी वृत्ती जोपासणारी बाजारपेठ हे मानसिक शांतता नष्ट करण्याचे, तणाव वाढण्याचे, नैराश्यग्रस्ततेचे कारण आहे हे माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष करुन आजची तरुण पिढी नुसतीच ’काहीतरी बदल हवा’ असं म्हणत आयुष्य समुळ बदलून टाकणारे बाह्य उपाय शोधत, अस्वस्थपणे, दिशाहीन फ़िरत रहातात त्यांच्याकरता मी माझा हा ब्लॉग लिहितो असे हार्दिक सांगतो. अशा अस्वस्थ, दिशाहीन तरुणांच्या मनात असंतोष, नाराजी, चीड, नैराश्य अशा नकारात्मक भावनांची अडगळ माजलेली असते. ती दूर करणे आधी महत्वाचे. या पायावरच त्यांना त्यांचे पुढचे आयुष्य मिनिमलिस्ट जीवनशैलीला अनुसरुन उभारता येईल. 

हार्दिकच्या प्रयत्नांचा भर वस्तुंची अडगळ दूर करण्यापेक्षा मनातली वैचारिक अडगळ दूर करणे, तणावांची मुळे उपटून दूर करणे, ताण मुक्त, आनंदी आयुष्य उभारण्याचे टप्पे एक एक करुन गाठणे यावर आहे. त्यामुळे मिनिमलिझमकडे जाण्याच्या त्याच्या प्रयत्नांचा पिरॅमिड पूर्ण उलटा आहे. जोशुवा किंवा लिओ बबुता यांच्या मिनिमलिझमच्या प्रयत्नांची अखेर जिथे, ज्या टप्प्यावर होते, तिथपासून आपल्या प्रयत्नांची सुरुवात करण्याचे आव्हान हार्दिकने पेलले. अर्थात त्याचीही अजून ही फ़क्त सुरुवात आहे.

मिनिमलिझमची सुरुवात आपल्या मनापासून करण्याचे हे तत्व अर्थातच अनुसरायला सर्वात कठीण. मात्र हार्दिकच्या मते काही साध्या वाटणा-या पण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण जर स्वत:ला दिली, आणि त्या उत्तरांमागची कारणे, जी तुमच्या आसपासच आहेत ती शोधली तर ही सुरुवात सहज सोपी होऊ शकते. 
ते प्रश्न म्हणजे- 
तुमचं आयुष्य आनंदी आहे का? 
तुमच्या आयुष्यात असणारी माणसे तुम्हाला आनंद देतात का? 
कोणता बदल आयुष्यात होणे तुम्हाला तातडीने आवश्यक वाटते? 
तुमच्या विचारांमधे भावनांची इतकी गुंतागुंत का आहे? 
कोणती गोष्ट तुम्हाला दु:खी करते? 
सगळ्यात जास्त हसू तुम्हाला केव्हा येते? 
आनंदाने नाच-गाणी केव्हा केलीत तुम्ही शेवटी? 
कसले ओझे आहे तुमच्या मनावर? 
असमाधानी नेमके का वाटते? 
तुमची करिअर मनाला आनंद देणारी आहे का? 
तुमचे मुक्त जगण्याचे स्वातंत्र्य ते हिरावून घेत आहे का? 

- असे तरूण मनालाच पडू शकणारे अनेक मुलभूत प्रश्न, मग त्यांचे उपप्रश्न हार्दिक एकामागोमाग एक विचारतो आणि त्यांची उत्तरे लिहून काढायला सांगतो. 

गरजा आणि इच्छा या मधला नेमका फ़रक काय इथवर येऊन ही प्रश्नमालिका संपते.

या प्रश्नांची उत्तरे आणि त्यावरचे उपाय हे आनंदी, सुखी आणि यशस्वी म्हणजेच मिनिमलिस्ट आयुष्याचे गणित आहे असे हार्दिकचे मत. त्याच्या ब्लॉगवर येणारे अनेक भारतीय, अभारतीय तरुण ही गणिते आपापल्या परिने सोडवण्याचा प्रयत्न करत रहातात. उत्तरे मिळवायला अनेक दिवस, आठवडे, महिने लागू शकतात याचं भान त्यांना तो देतो.

आधी मन आवरा आणि मग कपाट असे त्याच्या या ब्लॉगचे मुख्य सूत्र. 
प्रश्नांची उत्तरे शोधायला सातत्याने विचार करणे ही या आवरण्याची गरज असलेल्या कपाटाची किल्ली शोधण्याचा पहिला टप्पा. त्यानंतर मग शांतपणे, जाणीवपूर्वक आयुष्य जगायचे असेल तर मल्टी टास्किंग सोडून द्या आणि एका वेळी एकच गोष्ट करा. 
त्या क्षणामधे, त्या क्षणापुरतं पूर्णपणे जगा हा पुढचा टप्पा.

मिनिमलिझम संकल्पनेतली भारतीय परिमाणे शोधण्याचे प्रयत्न करणारा हार्दिक नागर एकटाच नाही. भारतीय तत्वद्न्यान आणि संस्कृतीमधे खोलवर रुजलेल्या मिनिमलिझमच्या मुळांबद्दल अधिक पुढच्या वेळी-  


No comments:

Post a Comment