Tuesday, March 14, 2017

सगळा पसारा..

घरात सगळ्यांनाच सुट्टी आहे, लॉन्ग वीकेन्ड. त्यामुळे निवांत दोनेक तास हाताशी मिळाले आहेत. खूप काही मार्गी लावता येईल या वेळात. दिवाळी अंकांची थप्पी घरात आहे, अनेक न वाचलेल्या पुस्तकांनी भरलेली रॅकही हाताशीच आहे. फ़्लिपकार्टच्या मेगा सेलवर घेतलेली पुस्तकं तर रॅपरही न उघडता ठेवली आहे. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेली हजारो ईबुक्स.. 
लिस्ट पाहूनच मनावरचं दडपण वाढतय. कधी वाचणार हे सगळं? रोजचे पेपरही पूर्ण पाहिले जात नाहीत. महत्वाच्या लिन्क्स फ़ेसबुकवर शेअर करतच कोणी ना कोणी.. जातात त्या वाचल्या.  

पुस्तक हातात घेण्याचा नाद सोडून फ़ेसबुकवर चक्कर होते.. तिकडे तासभर जातो.. मग रूटीन असल्यासारख्या उघडलेल्या खिडक्या. माय़बोली, पिन्टरेस्ट, इस्टाग्राम, ट्वीटर.. कोणीतरी ऑनलाईन भेटलं. मधेच व्हॉट्सअपवर मेसेजेस. लाईमरोड आणि मिन्त्रावरच्या ऑनलाईन सेलचा आज शेवटचा दिवस असल्याचा मेसेज पॉप अप होतो. जीमेल उघडलंच नाही कारण अनेक मेल्सना उत्तरं द्यायची राहिलीत.. हा एक ताण तर कायमच. निवांत वेळ बघता बघता उडून गेला.

मनाच्या तळाशी अस्वस्थतेचा अजून एक नवा थर रचला जातो. मग सुरु होते चिडचिड.   

कपड्यांची कपाटं आवरायची राहिली आहेत. ओसंडून वहात आहेत. नुकतीच दिवाळीच्या निमित्ताने घराची आवराआवर काढली होती त्यावेळी आता यांचं काय करायचं नेमकं असा हताश प्रश्न पडल्याने होती तशीच ठेवून दिलेली न वापरलेल्या वस्तुंची रास.. 
त्यात कॉस्मेटीक्सपासून मातीच्या भांड्यांपर्यंत आणि हॅन्डवोव्हन साड्यांपासून चुंबकमधून घेतलेल्या एक्झॉटिक पायपुसणी, बेडशिट्सपर्यंत बरंच काही. हातमागाची प्रदर्शनं, फ़्ली मार्केट, फ़ॅब इंडिया, खादीचा सेल, इन्फ़िनिटीची चक्कर, ग्लोबल देसी, डब्लूमधे आलेली नवी डिझाईन्स.. 
कशाकरता घेऊन ठेवलं हे आपण याला उत्तर नाहीच. मग आता उस्तवारीची जबाबदारी मनावर एक नवा ताण निर्माण करते आहे तो का झेपवत नाही
हे सगळं आत्ताच करायला हवं कारण पुढच्या महिन्यात हॉलिडे प्लॅन केला आहे. मेक माय ट्रीपवर टू वे एअर फ़ेअरची सुरेख डील्स मिळाली म्हणून इतका लांबचा प्रवास ठरवलाय. त्याची तयारी. जर्नी ऎपवर तयारीची लिस्ट अपडेट करायची राहिली आहे. वेळ कमी आहे.. 
तंत्रद्न्यान मदतीला आल्यावर तर काळ हातातून भोवंडून टाकणा-या वेगाने निसटून चालल्याचं फ़िलिंग येतं. सतत रिमाइंडर्स.. हे करायचं राहिलय.. ते टास्क अर्धवट ठेवालं आहे तुम्ही..

मागच्या पिढीत काळ ज्या वेगाने धावला त्याच्या शतपट वेगात आज काळ धावतोय.
मग तरीही सतत काहीतरी राहून गेल्याची घुसमट.. खूप काहीतरी करायचय, करायचं राहिलय, आजूबाजूचा साठत राहिलेला वस्तुंचा, माहितीचा, संपर्क साधनांचा ढीग.. 
हा कचरा तंत्रद्न्यान, माहितीच्या विस्फ़ोटातून जन्मलेला. कसा आणि कुठे ढकलून द्यायचा?
किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत
भस्मासूरासारखे सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय हवंय आपल्याला?
ईमेल, गुगल आणि विकिपेडिया पूर्वीचे दिवस, पत्रांची दिवसें दिवस, अगदी महिनाभरही वाट पहाण्याचे तर आता अरेबियन नाईट्स मधेच शोभतील इतके सुरस वाटतात.
पण काय बिघडत होतं? डावा अंगठा अचानक का ठणकत होता आपला काल रात्री हे वेब एमडीवर नाही तपासून पाहिलं लगेच, नाही कळले ग्रीन स्मुदी रोज पिण्याचे किंवा कढिलिंबाची पंचवीस पाने चावून खाण्याचे फ़ायदे, बी १२ किंवा अजून काही कमतरता शरिरात असण्याचे सिम्प्टम्स नाही पडताळून पाहिले, नाही कळले आपण आज आठ हजार पावले चाललो आहोत की तीन हजारच, रात्रीच्या रेम झोपेचा पॅटर्न ठीक होता का.. हे सगळं ट्रॅक न करताही त्या अद्न्यानाच्या अंधारात सुखाने झोप लागत होतीच ना?

घरातलं जुनं फ़र्निचर कुठे विकायचं, नसेल विकायचं तर स्वत:च रंगवून त्याला नवा मेकप कसा चढवायचा याबद्दलचे डिआयवाय व्हिडिओज नाही पाहिले तर नेमकं काय बिघडणार..

वाचायला घेतलेलं पुस्तक महिनोनमहिने रेंगाळत रहातं, जर कामाशी संबंधीत नसेल तर. लायब्ररीच्या पुस्तकांची डेट उलटून गेलेली असते. वाचताना सतत सोशल मिडियाचं डिस्ट्रॅक्शन आड येतं. 
सेल्फ़ कंट्रोल इतकी दुर्मिळ गोष्ट का झाली आहे
याला फ़क्त टेक्नॉलॉजीचे अ‍ॅडीक्शन म्हणता येणार नाही. मनाच्या तळाशी सातत्याने रचत गेलेल्या अस्वस्थतेच्या थरांखाली मनाची एकाग्रता उध्वस्त झालेली आहे. ते एकदा इथे स्थिरावायचा प्रयत्न करतय, एकदा तिथे. तसं पहाता बोट ठेवण्यासारखं काहीच झालेलं नाही. कामे, वैयक्तिक नाती व्यवस्थित निभावली जाताहेत, टेक्नॉलॉजीची मदत त्याकरताही होतच असते.
व्हर्चुअल माहितीचे ढिगारे मनाभोवती साठून रहात आहेत. कच-यासारखे.  खरेदीच्या मोहात पडून घेतलेले भौतिक वस्तुंचे शरीराभोवतीचे ढिगारे.. अंतर्बाह्य गुदमर वाढत चाललेली.
कम्पूटरशिवाय निभावणारच नाही, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सशिवाय करमणारच नाही हे खरे.. पण कुठेतरी शांतता हरवत चालली आहे. 
फक्त गॅजेट्सच्या वापरावर अवलंबून रहाण्याची केवळ खंत नाही ही. इन जनरलच सध्याचं आयुष्य जास्त गुंतागुंतीचं, गरज नसताना तेही करुन ठेवल्याची सातत्याने होणारी ही जाणीव आहे. 
अगदी आत्तापर्यंत जेवण हा प्रकार किती सोपा होता. पोळी,भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, चटणी. पण आता जगासोबतच स्वयंपाकघरही कधीच ग्लोबल झालं आहे. आज पोळीभाजी, उद्या अरेबिक स्टाईलचे मल्टीग्रेन पराठे, परवा ग्रील्ड तोफ़ू, मग फक्त सूप आणि सॅलडच, रवीवारी थाय करुया.. 
या सगळ्यात फ्रीज, फ्रिजर खच्चून भरत जातात. ग्रोसरीची कामं अतोनात वाढतात. 
कोप-यावरच्या वाण्याकडे पटकन जाता येता किंवा फ़ोनवरही यादी देता येत होती. पण आता ते पुरत नाही. मल्टीनॅशनल क्विझिनला हवे असणारे पदार्थ ऑनलाईन शोधत रहाणे सोयीचे होते. किंवा मग गोदरेज फ़ूड्स किंवा हायपर सिटीची चक्कर करायलाच लागते.
कुसकुस, किन्वाच्या रेसिपीज पहाव्या की आपल्या स्थानिक ज्वारीच्या रव्याच्या, पनीरच्या, नाचणीच्या पहाव्या, चिया सीड्स चांगल्या हेल्थकरता, काय म्हणतात त्यांना हिंदी-मराठीत? स्थानिक पर्याय कोणता आहे त्यांना? फ़्लॅक्स सीड्स म्हणजे आळशी की जवस? बसा शोधत. पिंटो बिन्स म्हणजे नेमकं काय? अगदी साधा चिवडा करायचा तरी वाटतं निशा-मधुलिकाच्या किंवा इतर फ़ूड ब्लॉग्जमधे काही वेगळी टीप दिली सेल तर बघूया. जेवणाच्या ताटात सगळे रंग हजर आहेत का, छुप्या क्यालरीज, प्रोसेस्ड पदार्थ जास्त नाहीत ना झालेले, तेल नेमकं कोणतं.. 
एरवी करायला आवडणारा स्वयंपाक आता या सतराशे भानगडींमधे सोपा आनंद घालवून बसतो आहे.
कोप-यावरचा वाणी एका फोनवर घरात सामान आणून टाकत असतानाही लोकल बनिया साईटवर अर्धा तास घालवून योग्य पॅकिंग, ब्रॅन्ड सिलेक्ट करण्यात, पुन्हा त्याच्या योग्य डिलिव्हरी स्लॉटसोबत ऎडजस्ट करण्यात आपण ताण कमी करतोय की वाढवतोय
घरातली अनुभवी, म्हातारी माणसं जे सांगतील तेच सल्ले, टिप्स व्हिडिओजवर बघत बसायचे, लहान मुलांकरता योग्य गेम्स, होमवर्क साईट्स शोधत रहायच्या, कागदाच्या चिटो-यावर लिहिलेल्या कामाच्या यादीऐवजी मोबाईल, लॅपटॉप वर टू डू लिस्ट स्टिकी नोट्सवर अपडेट करायच्या, आणि मग त्याच्या सतत वाजणा-या रिमाइंडर अलार्मचा ताण सोसत रहायचा. कुकींग पासून फायनान्स-बजेटींगपर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरे माहितीच्या जंजाळात धुंडाळत रहायची. जगाच्या दुस-या टोकाला आलेल्या त्सुनामीचे, भुकंपाचे, युद्धाचे दर मिनिटांचे हृदय विदारक अपडेट्स समोर पहात रहायचे, ज्या मुला अगर मुलीसोबत आपण शाळेतल्या दहा वर्षांमधे एकदाही बोललो नाही तिने फ़ॉरवर्ड केलेले जोक्स, ट्रीपचे फोटो न बघता डिलिट करत रहायचे. रिलॅक्स व्हायलाही टेक्नॉलोजीचाच आधार घ्यावा लागतो
रिलॅक्स होणे म्हणजे काय तर आयपॉड वर गाणी ऐकणं नाहीतर फोन वर कँडी क्रश. व्यायाम म्हणजे फ़क्त चालणे नाही. सतराशेसाठ व्यायाम प्रकार.
कशाला मुळात हे सगळं?

कन्फ़्युशियसचं एक वचन आठवतं अशा वेळी- आयुष्य सोपं असतं. आपण ते कठीण करण्याचा अट्टाहास जन्मभर करत रहातो.  

मिळालेलं द्न्यान फ़ुकट जात नाही, कुतूहल असणं वाईट नाहीच हे सगळं ठीक, पण गिळंकृत केलेल्या महितीमधून आपल्या द्न्यानसाठ्यात एक शतांशाचीही भर खरंच पडली आहे का गेल्या अनेक महिन्यांमधे याचा ताळेबंद कधी पहाणार. ज्या गोष्टी आपण वाचतो त्याची खरंच किती गरज असते? डोक्यात अनावश्यक कचरा मात्र निर्माण होत रहातो आहे. 
ताण येतो या सगळ्याचा, माहितीच्या स्फोटाचा ताण येतो.
मागच्या पिढीचं त्यामानाने बरंच बरं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगातल्या बहुसंख्य गोष्टी टेक्निकली चॅलेंज्ड असल्याने त्यांच्याकडून आपोआपच स्किप होतात.
संतुष्टता हवी मनाला हा संस्कार नेमका कधी पुसला गेला मनावरुन
पैसा काय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काय.. झोळी फ़ाटायलाच तयार नाही. वस्तु जमवण्याची, माहिती मिळवण्याची इतकी हाव नेमकी का? त्यामधे संतुष्टता हवी आहे असं आता तीव्रतेनं जाणवायला लागलं आहे.
अमेझॉन किंडलवर खूप पुस्तकं फ्री किंवा अगदी मामुली किंमतीत मिळतात. कोर्सेरावर विविध विषयांवरचे कोर्सेस फुकटात करायला मिळतात. दर शुक्रवारी मेगा सेल असतो ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर. अगदी ६०% डिस्काउंटही सहज मिळतो. सतत डील्स पाहणे सुरू. 
अरे खरंच हवं आहे का पण हे सगळं. 
अस्वस्थता माहीती तंत्रद्न्द्यानाच्या वापराबद्दल नाही. अतीव जिद्न्यासा, हाव यामुळे असमाधानीपणाकडे झुकणार्‍या मनस्थितीबद्दलची आहे.
फेव्हरिट्सच्या फोल्डरमधे शेकड्यांनी लिन्क्स स्टोर केल्या आहेत. अगदी क्वचितच त्यातली एखादीही पुन्हा उघडून बघीतली जाते. कितीतरी गोष्टी नंतर वाचु म्हणुन सेव्ह करुन ठेवल्या आहेत. 
लिहिण्याच्या डोक्यात आलेल्या अनेक कल्पना एके ठिकाणी नोट डाउन केलेल्या आहेत, त्यातलं दहा टक्केही प्रत्यक्षात आलेलं नाही. 
असंख्य गाणी, करु कधीतरी म्हणून जमवलेली फ्लॉवर क्राफ्टची पुस्तकं, स्टेन ग्लास पेंटींगकरता काचा असं इतकं जमवून शेवटी फावला वेळ मिळाला की घालवला कशात जातो आहे तर सोशल मिडियावर. तिथून काहीच मिळत नाही असं नाही. हजारो मुव्हीज, डॉक्युमेंटरीजचा, ईबुक्सचा खजिना उपलब्ध होतो, अगदी ब्लॉग्ज, मायबोली, ऐसी अक्षरेसारख्या साईट्सवरुनही खूप काही कल्चरल खाद्य मिळतं, पिंटरेस्ट सारख्या साईटवर सुंदर आर्ट, क्राफ्टसंदर्भात प्रेरणादायी गोष्टी मिळत रहातात,.. 
पण हे सर्व रिचवायलाच जमत नाहीये. सर्व जमवत रहायचं, मग आधी जमवलय त्याचं काय, ते कधी ऐकणार, पहाणार, करणार? सगळं नुसतंच भराभर गिळत रहायचं. यात रवंथ कुठेच होत नाहीये.

हल्ली बरीचशी आर्ट एक्झिबिशन्सही ऑनलाईन बघीतली जातात, आर्टिस्ट्स, लेखक, कलाकारांच्या मुलाखतीही ऑनलाईन वाचायच्या. स्काईपवर भेटी घ्यायच्या. वेळ नाही या सबबीखातर गोष्टी बघायचं, अनुभवायचंही टाळलं जात आहे. व्हर्चुअल माहिती मिळते आहे. सांस्कृतिक उथळपणा यातूनच वाढत जातो. स्वत:त आणि इतरांच्यात.  
घरात कुठे ना कुठे सतत लॅपटॉप, डेस्कटॉप, गाणी, टीव्ही, फोन, वायफ़ाय चालू असते, त्यामुळे बाह्य जगाशीही ओव्हर कनेक्टेड असल्याचं फिलिंग असतं.

सगळंच अती झालं आहे. सोशल मिडियात वावरणे, इमेल्सना वेळच्या वेळी उत्तरे देणे, मेसेजेस चेक करणे, टाइमलाईनवर शेअर केले गेलेले व्हिडिओज बघणे, पोस्ट्स वाचणे, लाईक करणे किंवा आलेल्या प्रतिसादांना धन्यवाद देणे सुद्धा मनावर ताण आणते. कदाचित अती तिथे माती हेच खरं.

असंख्य पर्याय समोर असतात. खरेदी, हॉटेल्स, रेस्त्रां, कपडे, करिअर, हॉलिडेज अगदी रिलॅक्स होण्याचेही. दर क्षणी निर्णय घेण्याचा, अपडेटेड रहाण्याचाही ताण. त्याचा येणारा फ़टिग.. सगळ्यांनाच जाणवतोय.
या चक्रात पाश्चात्य जग आधी सापडले आणि आता त्यातून बाहेर पडण्याची धडपडही त्यांच्याकडेच आधी सुरु झाली. त्याच चक्रावर आता आपण स्वार होऊनही बराच काळ लोटला आहे. 
त्यावरुन पायउतार होण्याची धड्पड कुठेतरी अप्रत्यक्ष सुरु होतेच आहे मनात.



No comments:

Post a Comment