Tuesday, March 14, 2017

मोठ्या घरामुळे प्रश्न सुटतो?

शहरातल्या दगदगीच्या, घड्याळाच्या काट्याशी बांधलेल्या दिनक्रमाचा, पैसे मिळवण्याकरता कराव्या लागणा-या कष्टाचा, मग त्या जमा केलेल्या पैशांच्या व्यवस्थापनाचा, त्यातून विकत घेतलेल्या वस्तु, सुखसोयी सांभाळण्याचा, उपभोगाकरता बांधलेल्या आलिशान घरांचा, ती सुस्थितीत राखण्याकरता, सजवण्याकरता पुन्हा कराव्या लागलेल्या कष्टाचा आणि दगदगीचा एका विशिष्ट टप्प्यावर कितीही उबग आला तरी त्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न लाखांमधे एकाचाही नसतो कारण सुखासीन जीवनशैलीची, उंचावलेल्या राहणीमानाची झालेली सवय मोडणे, पुन्हा साधेपणाकडे येणे जवळपास अशक्य असते असा सर्वांचाच समज असतो.
घेतलेल्या वस्तु ठेवायला घरात जागा कमी पडणे यावर एक सोपा आणि महागडा उपाय अनेकांच्या मनात असतो. मोठं घर घेणे. अर्थातच तसं होत नसतं. 
मर्फ़ीच्या नियमानुसार जितकी मोठी जागा तितका जास्त पसारा. पण हे सहजा सहजी मान्य होणार नसतं. हा उपाय अमलात आणला की सगळेच प्रश्न सुटतील. भरपूर जागा होईल भरपूर वस्तु नीट ठेवायला असं वाटतच रहातं. 
आहे त्यापेक्षा मोठं घर असावं हे स्वप्न बाळगून असतात अनेक जण याकरताच. रहातं घर पुरत नाही या एका विचारानी भारतात, निदान मुंबईसारख्या शहरात अनेकांची आयुष्य असमाधानी केली आहेत.

अनेकजण असतात ज्यांनी क्लटरफ़्री, मिनिमलिस्ट लाईफ़स्टाईल ज्यांनी यशस्वीरित्या जगायला सुरुवात केली आहे त्यांच्याबद्दल वाचताना आपल्यालाही हे करुन पहाणे शक्य आहे, निदान काही प्रमाणात तरी असे अनेकांना वाटत रहाते. मात्र हे वागणे प्रत्यक्षात येत नाही, तसे येणे सोपेही नसते.

आपल्या अगदी साध्या प्रयत्नांमधेही सातत्य रहातेच असे नाही कारण बहुतेक वेळा आपल्या मनात त्यासंदर्भातला विचार नुसताच सतत मनात घोळत राहिलेला असतो. यात माझा समावेश अर्थातच आहे. आजवर विकत घेतलेल्या वस्तु निदान एकदा तरी वापरुन झाल्याशिवाय, कपाटात जमवलेल्या साड्या वर्षातून निदान एकदा तरी नेसल्याशिवाय, घेतलेली पुस्तकं पूर्ण वाचून झाल्याशिवाय नवं काही घ्यायचं नाही हा मनाशी केलेला साधासुधा संकल्पही प्रत्यक्षात अनेकदा मोडतो. घरात नवनव्या वस्तु, कपडे, पुस्तके येतच रहातात.

क्लटरफ़्री, मिनिमलिस्ट लाइफ़स्टाईलची संकल्पना प्रत्यक्षात आपल्या स्वत:च्या, आपल्या खिशाच्या, आपण ज्यात रहातो त्या पर्यावरणाच्याही भल्याची आहे हे पटून देखील ती जगण्याचा विचार दहा टक्केही प्रत्यक्षात उतरतच नाही.

असं का होतं नेमकं?      


No comments:

Post a Comment