Tuesday, March 14, 2017

मिनिमलिझम आणि झेन

मिनिमलिझममधले सौंदर्य, आपल्या आयुष्याचा पोत आणि दर्जा सुधारण्यातले त्याचे योगदान माहित असून, मान्य असूनही प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा वापर करणारी लोकं दुर्मिळ असतात. 

मिनिमलिस्ट जीवनशैली कशी असावी याची माहिती देणारे अनेक लेख, ईबुक्स, ब्लॉग्ज लिहिले जातात तरीही प्रत्यक्षात नेमकी कशी आणि कुठून सुरुवात करावी बहुतेकांना कळत नाही. 
मात्र ज्यांना झेन तत्वद्न्यानाबद्दल थोडीफ़ार माहिती आहे त्यांना मिनिमलिझमचा वापर रोजच्या जगण्यात करणं तुलनेनं सोपं जातं.

मिनिमलिझमचा आज इतका गवगवा होण्याचे, या जीवनशैलीचे इतके आकर्षण वाटण्याचे कारण त्याची वाटू लागलेली नितांत गरज हेच आहे. 
वेगवान जगण्याचा ताण हलका करण्याकरता कुणाला बंधमुक्त प्रवास करायचा आहे, कुणाला उच्च जीवनशैलीच्या मोहापायी डोक्यावर वाढत गेलेल्या कर्जाचे ओझे झुगारुन द्यायचे आहे. काही इतरांच्या अनुभवांवरुन वेळीच शहाणे झाले म्हणून, काहींना मिनिमलिस्ट जीवनशैली फ़ायदेशीर वाटते आहे म्हणून.. अशी अनेक कारणे.

भौतिक जीवन, वस्तु नाशवंत आहेत त्यामुळे त्याचा मोह टाळला तर अनेक दु:खांमधून सुटका होऊ शकते ही बुद्धाची विचारसरणी झेन तत्वद्न्यानाचा मूळ स्त्रोत आहे.

या विचारसरणीतले काही मुद्द्यांवर मिनिमलिझम आधारीत आहे. ते मुद्दे असे-  

-आपल्या आयुष्यातला आनंद हा कोणत्याही वस्तुवर अवलंबून नाही. वस्तुंचे आपल्याजवळ असणे किंवा नसणे हे आपल्या आनंदाचे किंवा दु:खाचे कारण होऊ शकत नाही.

-वस्तुंमधली भावनिक गुंतवणूक धोकादायक असते. त्यामुळे आपल्याला तिचा त्याग करता येत नाही, जर ती वस्तु तुटली किंवा हिरावली गेली तर आपल्याला अपरिमित दु:ख होते किंवा संताप येतो. अनेक मानसिक त्रासांचे मूळ वस्तुंच्या मोहात असते.

-भावनिक गुंतवणूकीपासून दूर रहाणे- आपल्या जवळच्या वस्तु ही आपली ओळख नाही. वस्तुंच्या पलीकडेही एक जीवन आहे आणि ते जास्त सुंदर, सोपे आहे. आपल्याजवळ असलेली प्रत्येक भौतिक वस्तु ही नाशवंत आहे, ती कधीही तुटी शकते, तिची चोरी होऊ शकते, ती इतर कुणाला जास्त उपयोगी असू शकते, ती जुनी, कालबाह्य होऊ शकते, विकली जाऊ शकते किंवा फ़ेकून देता येऊ शकते हे मान्य करणे. वस्तुंना चिकटलेल्या आठवणी ही एक भासमय, अमूर्त कल्पना आहे.
भौतिक सुखापेक्षा मानसिक सुख जास्त महत्वाचे आणि टिकावू असते. 

आपल्या साधुसंतांनी तरी वेगळे काय सांगीतले आहे.   

झेन विचारसरणीनुसार साधेपणा, विचारीपणा या दोन गोष्टींमुळे आपल्या रोजच्या जगण्यातल्या गजबजाटाचे आणि कोलाहलाचे रुपांतर शांततेत, आनंदात होते.

झेन सवयींद्वारे आपली कार्यक्षमता वाढवण्याच्या अनुभवांवर झेन हॅबिट्सहा ब्लॉग लिहिणारा लिओ बबुता स्वत:ला झेन तत्वद्न्यानाचा अभ्यासक मानत नाही. आपण केवळ काही झेन सवयींचा आपल्या रोजच्या जगण्यात अंतर्भाव केला आहे त्याचा आपल्याला फ़ायदा होतो असे तो सांगतो. तरीही त्याचे ब्लॉगविश्वात शेकडो अनुयायी आहेत. 

लिओ बबुता हा एक साधासुधा अमेरिकन माणूस. लग्न झालेला, सहा मुलांचा बाप. त्याला लिहायची आवड. मात्र आपल्या हातून लेखनाच्या क्षेत्रात काही भरीव काम होत नाही, फ़ुटकळ लेख, सदरं लिहून होतात पण नावावर पुस्तक नसल्याने आपल्याला कोणी लेखकसमजत नाही ही त्याच्या मनात खंत. घरात पैशांची आवकही फ़ार नाही त्यामुळे आर्थिक विवंचनांचा ताण आणि बायको नोकरी करत असल्याने घराची जबाबदारी आणि आपले लिखाण सांभाळून लिओला इतर काही काम करणेही शक्य नव्हते. सतत सिगारेट ओढण्यामुळे, लिहिण्याच्या बैठ्या कामामुळे लिओचे वजनही अतिरिक्त प्रमाणात वाढले होते आणि तब्येतीच्या असंख्य कुरबुरी मागे मागलेल्या.

सगळे ठरवतात तशाच साध्या साध्या गोष्टी लिओ रोज मनाशी ठरवत असे. वर्षाच्या सुरुवातीला संकल्प म्हणून योजलेल्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे हे लहानसे भाग. त्या अगदी साध्या गोष्टी असत. उदा. पैसे वाचवणे, रोज व्यायाम करणे, सकाळी लवकर उठणे, भरपूर लिहिणे, कागदपत्रे नीट आवरुन ठेवणे, घराची व्यवस्था लावणे.. 
आपल्या टू डू लिस्टमधे आपण रोज या गोष्टी लिहितो आणि त्यांच्यापैकी एक चतुर्थांश गोष्टीही पूर्ण होत नाहीत, पाळल्या जात नाहीत म्हणून लिओ मनाशी खट्टू होत असे.

क दिवस सर्फ़िंग करता करता लिओला झेन विचारसरणीबद्दल लिहिलेली एक वेबसाईट मिळाली. वाचता वाचता तो त्यात गुंगून गेला. अगदी साध्या, सोप्या भाषेत लिहिलेल्या काही झेन गोष्टी त्यात होत्या. 
आपल्या आयुष्यात इतका गोंधळ, ताण का आहे, लहान सहान कामेही का पूर्ण होत नाहीत, मनासारखं का जगता येत नाही याची उत्तरे लिओने झेन तत्वद्न्यानात शोधायचा प्रयत्न केला. त्यातून त्याला जी उत्तरे मिळाली त्यांच्या सहाय्याने त्याने आपलं आयुष्य कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न केला.
पुढच्या दोन वर्षांतच लिओचं आयुष्य या उत्तरांनी बदलवून टाकलं.

डिसेंबर २००५ ला लिओने आपल्या रोजच्या जगण्यात झेन सवयी बाणवायला सुरुवात केली. 

मिनिमलिझम किंवा घरातल्या वस्तू कमी करणे ही गोष्ट त्याच्या अग्रक्रमात तुलनेने बरीच उशिरा आली, पण लिओच्या मते त्याच्या पुढच्या पूर्ण आयुष्याचा तोल त्यानंतरच म्हणजे मिनिमलिझमच्या त्याच्या आयुष्यातील प्रवेशानंतरच ख-या अर्थाने सुधारला.

नको असलेल्या गोष्टींना आयुष्यातून वगळणे हा विचार लिओ बबुताने फ़क्त वस्तुंकरता वापरला नाही. खरं तर वस्तुंच्या संदर्भातून तो विचार करतच नव्हता. 
आपलं आयुष्य सुधारण्याच्या, आपली क्षमता असूनही यश मिळण्याच्या आड ज्या गोष्टी येत आहेत त्यांची बबुताने एक यादी तयार केली आणि मग एकेक करुन त्यांना तो आपल्या आयुष्यातून दूर करु लागला.
सर्वात पहिला नंबर लागला सिगारेट्सचा. 
सिगारेट्स सोडणे आपल्याला आयुष्यात कधीही शक्य होईल याची अपेक्षा बबुताने सोडली होती. 
मात्र अनावश्यक वस्तुंना वगळाया झेन तत्वाला प्रामाणिक राहून त्याने एक दिवस घरातील सर्व सिगारेट्सचे साठे नष्ट केले.

स्मोकिंग अचानक बंद केल्याने येणारा ताण घालवायला त्याने पळायला सुरुवात केली. बबुता सकाळी उठल्यावर येणारी सिगारेटची आठवण टाळण्याकरता उठल्यापासून धावायला जाई. हळू हळू त्याला ते आवडायला लागले. सुरुवातीला अर्धा मैल धावल्यावर धापा टाकणारा बबुता आता लांब पल्ल्याच्या मॅरेथॉन सहज पूर्ण करतो.

पळायला जाण्याच्या सरावाकरता बबुता पहाटे लवकर उठायला लागला. सकाळच्या शांत वातावरणात त्याच्या सर्जनशीलतेला नवे धुमारे फ़ुटले. आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, कसे करायचे आहे यावर विचार करायला त्याला भरपुर वेळ मिळाला.

आपण मनाशी जे ठरवले आहे ते पार पडेलच याचा नवा आत्मविश्वास मनात निर्माण झालेल्या बबुताने आपल्या ध्येयपूर्तीला पद्धतशीर सुरुवात केली. त्याची पहिली पायरी होती आयुष्यात व्यवस्थितपणा आणणे. त्याकरता त्याने आपल्या वस्तु, कागदपत्रे, घर निटनेटके आवरुन ठेवायला सुरुवात केली.

मॅरेथॉन पूर्ण करण्याकरता शरिर तंदुरुस्त ठेवणे गरजेचे होते. त्याकरता त्याने वजन कमी करण्याचे ठरवले. धावण्याच्या जोडीला आरोग्यपूर्ण, योग्य आहार घ्यायला त्याने सुरुवात केली. बाहेरचे खाणे बंद केले. ताज्या भाज्या, फ़ळे, धान्य, मासे यांचे आहारातले प्रमाण वाढवले. हळू हळू तो पूर्ण शाकाहारी बनला.

वेळाचे, उर्जेचे योग्य व्यवस्थापन करायला वेळ मिळाल्यावर बबुताच्या कार्यक्षमता वाढली. त्याचे लिखाण व्यवस्थित चालू होतेच शिवाय त्याने एका पब्लिशिंग हाऊसमधे अर्धवेळाची नोकरी धरली. आता त्याचे उत्पन्न आधीपेक्षा तिपटीने वाढले. घेतलेली कर्जे फ़िटली. साहजिकच मनावरचा ताण हलका झाला. आर्थिक सुरक्षितता आल्यामुळे त्याला मनासारखे, हवे तेच लिहिता येणे शक्य झाले. 

बबुताने आपल्या आयुष्यातली पहिली कादंबरी झपाट्याने केवळ काही महिन्यांमधे लिहून पूर्णही केली. त्यानंतर त्याने झेन सवयींच्या फ़ायद्यांवर झेन टू डन’, ’द पॉवर ऑफ़ लेसइत्यादी अमेझॉनच्या बेस्ट सेलिंग यादीत अग्रेसर असलेली पुस्तके लिहिली.

बबुता सांगतो, मला कोणतीही जादूची कांडी मिळालेली नव्हती, माझा स्वभावही फ़ारसा निग्रही नाही. मी फ़क्त झेन तत्वानुसार बबुताने अनावश्यक वस्तु, विचार वगळून माझ्या वागणुकीत आणि घरामधे साधेपणा आणला ज्याचा मला फ़ायदा झाला. 
बबुताच्या मेलबॉक्समधे आता अनावश्यक असे एकही पत्र नसते, आणि घरात बिना गरजेची एकही वस्तु नसते.

लिओ बबुता केवळ अडगळ कमी करणे, कमी वस्तु विकत घेणे वर थांबला नाही. तो सांगतो-
नको असणारे अन्न वगळा- जेवणाच्या टेबलावर, आपल्या प्लेटमधे इतक्या भरमसाठ गोष्टी कशाला, खाद्यपदार्थांचे निवड करायलाही कठीण इतके वैविध्य, इतका मोठा पोर्शन साईझ गरजेचा आहे का? शरिराला गरज नसणारे अन्न ताटातून कमी करा. रोजचे अन्न पौष्टीक, ताजे, मोजके आणि पोटभरीचे असणे गरजेचे आहे.

नको असणारी कामे वगळा- खूप कामे, गरजेपेक्षा अधिक गोष्टी करण्याची खरंच गरज आहे का? आपल्या रोजच्या कामांच्या यादीला काळजीपूर्वक तपासा. खरंच जे गरजेचे आहे, आनंद देणारे आहे तेवढेच करा. तरच आयुष्यात नेमके काय करायचे आहे त्यावरच तुमचे लक्ष केन्द्रित होऊ शकेल, नाहीतर बिना गरजेची, बिना महत्वाची कामे करण्यातच आपली जास्त उर्जा, वेळ, पैसा खर्च होत आहे हे लक्षात येईल.

अशक्य असणारे संकल्प वगळा- आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे ते नीट ठरवा. वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेली किंवा आपल्या बकेट लिस्टमधे असलेली १००१ ध्येयं खरंच आपल्याला पूर्ण करायची आहेत का? जे आपल्याला तीव्रतेनं, मनापासून करायचं आहे त्यांची संख्या सहज १० पर्यंत येऊ शकते हे तुमच्या लक्षात येईल.

तुम्ही सर्जनशीलम कलावंत वृत्तीचे असाल तर आपण कशाची, किती निर्मिती करतो आहोत याचे भान बाळगणे सर्वात जास्त आवश्यक आहे, बुद्धी, वेळ, सर्जनशीलता खर्च करुन भरमसाठ, सामान्य कलाकृती निर्माण करण्यापेक्षा मोजक्याच, दर्जेदार कलाकृती निर्माण केल्या तर त्या जास्त, चिरकाल टिकणारा आनंद देतील. लेख, संगीत, शिल्प, चित्र.. जे सामान्य आहे, तुम्हाला कमी दर्जाचे वाटते आहे, ते नष्ट करा. त्यामुळे तुमचे आयुष्य सोपे, दर्जेदार आणि जास्त आनंदी होत आहे हे लक्षात येईल.

--


No comments:

Post a Comment