Tuesday, March 14, 2017

आपापले वॉल्डेन

आयुष्य जास्तीत जास्त सोपेपणाने जगणे, कमीत कमी वस्तु वापरणे, गरजेपुरतेच जमवणे आणि कोणत्याही ताण तणावाशिवाय आनंदात जगणे हा विचार वाचताना कितीही आकर्षक, हवासा वाटला तरी प्रत्यक्षात वॉल्डेनकाठी जाऊन रहाणारा थोरो एखादाच असतो. 

एक दिवस मी माझ्या धावपळीच्या दिनक्रमातून, ताणतणावांमधून स्वत:ला मुक्त करुन कुठेतरी लांबवर प्रवासाला, जंगलात निघून जाणार आहे, किंवा एक दिवस शरिरावर चढलेले अतिरिक्त चरबीचे थर भरपूर व्यायाम करुन वितळवून टाकणार आहे या शेखचिल्ली स्वप्नांपैकीच हेही अजून एक स्वप्न असते बहुतेकांचे.

प्रत्येक शहरवासियाच्या मनातले हे आपापले वॉल्डेन.

मिनिमलिस्ट लाइफ़स्टाईल प्रत्यक्षात जगणे वाचताना वाटते तितके सोपे नाही, सगळ्यांना तसं जगणे शक्य नाही हे एकदा मान्य केले की मात्र प्रश्न सोपा होतो. काही मार्ग सापडू शकतात. 

मिनिमलिस्ट जीवनशैलीच्या दिशेने घेऊन जाणारे लहान लहान सोपे रस्ते.

थोरो आपल्या आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर जसं जगला, त्यातून त्याचे जे विचारचिंतन झाले, त्याला जी मन:शांती लाभली हा एक शंभर टक्के पूर्णत्वाला गेलेला आदर्श मानला तरी तिथवर येऊन पोचण्याकरता त्यानेही अनेक लहान लहान प्रयत्न आयुष्यभर केले. 
काही वर्षं करिअरमधे ब्रेक घेऊन हिमालयात किंवा जगात कुठेही भटकंती करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारेही अनेक असतात. ते प्रत्यक्षात आणण्याकरता त्यांनाही कितीतरी अर्थिक नियोजने, शारिरीक तंदुरुस्ती, कौटुंबिक अडचणींवरचे उपाय शोधून त्यावर मार्ग काढून मगच असं मुक्तपणे भटकणं सोपं झालेलं असतं.

क्लटरफ़्री, मिनिमलिस्ट लाइफ़स्टाईल आपण जगायला हवी या वरवर साध्या वाटणा-या ध्येयातही अनेक उपप्रकार असतात. 
एका प्रश्नाचे उत्तर स्वत:ला प्रामाणिकपणे विचारायला हवा की मिनिमलिस्ट, क्लटरफ़्री जीवनशैली मला नेमकी का हविशी वाटते आहे
साधं रहाणीमान हवं आहे, पैसे वाचवायचे आहेत, खरेदी कमीत कमी करायची आहे, पर्यावरणस्नेही जगायचं आहे, धावपळ-दगदग कमी करायची आहे, आहे तो व्याप कमी करुन अडगळमुक्त आयुष्य जगायचं आहे, ताण-तणाव कमी करुन हवे आहेत, पैसे कमावण्याचा हव्यास व त्याकरता करावे लागणारे कष्ट कमी करायचे आहेत.. 
काय नेमकं हवं आहे आपल्याला वैयक्तिक पातळीवर? की नेमकं काय हवय तेच कळत नाही? की हे सगळंच करावसं वाटतय?

या गोंधळावर कोणतही एक रेडीमेड उत्तर अर्थातच नाही. आणि हा गोंधळ असणेही पूर्ण नैसर्गिकच. 

मग रहातं इतकंच शिल्लक की यापैकी इतरांनी काय काय केलय यापेक्षा नेमक्या कशाने आपल्याला जास्तीत जास्त आनंद होईल आणि नेमकं काय करणं आपल्याला जास्तीत जास्त सोपं वाटतय त्याचा शांतपणे विचार करुन, वेळेची एक चौकट ठरवून त्यानुसार वागायला सुरुवात करणे. 
असं वागत असताना ज्या ज्या वेळी आपल्याला ठरवल्यानुसार वागणं कठीण जाईल, आपला नियम आपण मोडत आहोत असं वाटेल तेव्हा आपलं प्रामाणिक उत्तरच आपल्या मदतीला धावून येतं हा माझा वैयक्तिक अनुभव. 

माझ्यापुरता मी एक प्रश्न प्रत्येक नव्या खरेदीच्या वेळी क्रेडीट कार्ड पुढे करण्याआधी स्वत:ला विचारणे बंधनकारक केले आहे. खरंच याची गरज आहे का?”

असा एक प्रश्न अनेक उत्तर नजरेसमोर आणतो. उदा. घरात मुळातच अशा प्रकारच्या दुस-या वस्तु आहेत, घरातली आधीची वस्तु दुरुस्त करुन, बदलून वापरता येणे शक्य आहे, या किमतीत मला इतर काही गरजेच्या वस्तु विकत घेणे शक्य आहे.. इत्यादी. 

वेगवेगळे सेल लागतात, भरभरुन वहाणारे एक्स्पो मोह घालतात, आनंदाचे समारंभ समोर असतात जे साजरे करायला वस्तु हव्याच आहेत घ्यायला असं वाटतं.. नियम मोडतो, संकल्प धुळीला मिळतो. पण हार मानायची नाही. हा अपवाद होता असं स्वत:ला पटवायचं आणि मग एक वस्तु घरात आली म्हणून तिच्या जागी आधीच्या पाच घराबाहेर काढायच्या, गरजूंना दान करायच्या, पुनर्वापराकरता द्यायच्या. 
हा नियम पाळायचा. असं झालं की एक ना एक दिवस आपल्याला आपल्या भोवतालची अडगळ, पसारा कमीत कमी होऊन आपण मिनिमलिस्ट जीवनशैलीची एक पायरी तरी यशस्वीपणे चढलो आहोत याचं समाधान मिळेल. 
याच आशेवर निदान मी तरी आहे. 

एक ना एक दिवस मला माझे वॉल्डेन सापडेल.


No comments:

Post a Comment