Tuesday, March 14, 2017

कपाट आवरुन स्वच्छ झालं आहे का?

भोवतालच्या आणि आतल्या अडगळीचा, पसा-याचा मनावर येणारा ताण अती झाला, कोलाहल वाढला आणि त्यातून हा कॉलम सुरु झाला. 
जीवनशैली सोपी, ताणविरहित करायचे वैयक्तिक पातळीवर प्रयत्न चालू असताना साहजिकच बाहेरच्या जगातही या संदर्भात अनेकांचे चालत असलेले प्रयोग वाचनात येत राहिले. 
मिनिमलिझम हे तत्व किती वेगवेगळ्या पातळ्यांवर, सखोलतेनं आणि सहजतेनं आपल्या रोजच्या आयुष्यात सामावून घेता येऊ शकतं हे त्यातूनच लक्षात येत गेलं. 

कोणताही बदल हा कधीच सोपा नसतो. जीवनशैलीतला तर नाहीच. 
अडथळे, पसारा, अडगळ आपणच निर्माण केलेले असतात, ते दूर सारणं, आवरुन ठेवणं आणि मोकळा, स्वच्छ अवकाश आपल्या सभोवताली निर्माण करणं, आणि मग तो आपल्या आत झिरपू देणं हे साधं वाटणारं वाक्य जीवनाचे तत्व म्हणून स्विकारण्याचे प्रयत्न शतकानुशतके, वेगवेगळ्या संस्कृतीमधे अनेकांनी केले. पिढ्यानपिढ्या ते हस्तांतरित होत राहिले. झेनसारख्या तत्वद्न्यानाचा पाया त्यातून उभारला गेला.

मिनिमलिझम माझ्या जीवनशैलीत पूर्णपणे भिनला गेला आहे का
या प्रश्नाला होअसे उत्तर द्यायला आवडले असते. पण ते तसे देता यावे याकरताच तर हा अट्टाहास. 
कधीतरी, आयुष्यातल्या पुढच्या एखाद्या टप्प्यावर ते निश्चितच देता येईल. तोवर कमीतकमी खरेदी, गरजेपुरतीच साठवण, पसा-याचे व्यवस्थापन सातत्याने करत रहाणे हे आवर्जुन करत रहाणे आवश्यक. 

नविन वर्ष उंबरठ्यावर असताना तुम्हालाही नव्याने मिनिमलिझमच्या संकल्पाची आठवण त्याकरताच नव्याने करुन द्यायची आहे.

तुमचं कामाचं टेबल फ़ाईल्स, पुस्तके, बिलं, पावत्या, कागद, कामाच्या याद्या यांनी गजबलेले असेल, तुमचं कपड्यांचं कपाट न होणारे कपडे, उन्ह न लागलेल्या साड्या, महागडे पण घट्ट ब्लाउज, ओढण्यांच्या गुंडाळ्या, स्टोल्स, जॅकेट्सच्या पसा-याने ओसंडून वहात असेल तर नववर्षाच्या संकल्पाच्या याद्या बनवण्याच्या आत तुम्ही एका जागी जरा शांत बसा आणि स्वत:शीच मान्य करा की मला मिनिमलिस्ट लाइफ़स्टाइलची तत्वे पुन्हा एकदा जाणून घ्यायची गरज आहे. 
आतला आणि बाहेरचा पसारा, अडगळ आवरण्याची गरज आहे. 
तुमच्या आतही असाच पसारा असेल हे वेगळं सांगायची गरजच नाही. तुमच्या भोवतालातच त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं.

पसारा किंवा अडगळ होण्याचं, साठण्याचं एकमेव कारण म्हणजे लेट गोकरण्याची, नको असलेलं सहजतेनं सोडून देण्याची स्वत्तली अक्षमता. त्यात कधी भावनिकता असते, आठवण असते, किंवा भविष्याची आशाही असू शकते. 
अर्थात आपला आळशीपणा, हलगर्जीपणा किंवा बेफ़िकिरपणाही तितक्याच प्रमाणात असू शकतो. 
तेव्हा कारणामधे फ़ार गुंतून न रहाता उठा आणि फ़ेकून द्या, किंवा पुनर्वापर करायला योग्य व्यक्तींच्या हवाली करा. 

आपल्या रोजच्या जगण्यातले कानाकोपरे या अडगळीमुळे धूळीने व्यापून जातात, आपल्यातली कार्यक्षमता मंदावते, आर्थिक क्षमता खालावते. ज्या क्षणी अडगळ, पसारा आवरायचा जाणीवपूर्वक निर्णय तुम्ही घेता त्याच क्षणी स्वच्छ, हवेशीर भोवताल तुमच्या अवती भवती, आतमधे निर्माण होण्याची प्रक्रिया सुरुही झालेली असते. 
भावनिकदृष्ट्या हलकं, सकारात्मक वाटण्याची ही सुरुवात असते.

आपण इतक्या वस्तु साठवून ठेवू शकलो, आपल्याकडे इतक्या साड्या, कपडे, दागिने, भांडी, पुस्तकं आहेत.. 
हे जमा करण्यात आपण आपल्या श्रमाने साठवलेले पैसे, वेळ खर्च केला आहे, आपल्या वाडवडिलांनी, सुहृदांनी प्रेमाने सोपवल्या आहेत त्यातल्या ब-याच गोष्टी आपल्याकडे त्यामुळे या सर्वांबद्दल मनोमन कृतद्न्यता व्यक्त करुन त्यातल्या न लागणा-या, जास्तीच्या, तुमच्याकरता निरुपयोगी वस्तु अशा कुणाकडे तरी सोपवा ज्यांना त्याचा उपयोग होईल. 
तसं कोणी आसपास नसेलच तर फ़ेकून द्या, विका किंवा दान करा. 
मारी कोन्दोने सुचवलेल्या कोनमारी मेथडचा त्याकरता वापर करु शकता. 

मारी कोन्दो सुचवते- तुम्हाला काय फ़ेकायचं आहे हे ठरवता येत नसेल तर तुम्हाला स्वत:कडे काय ठेवावसं वाटतं याचा विचार आधी करा. त्या वस्तुंकरता चांगली, मोकळी, हवेशीर जागा निर्माण करा. 
हे कसं करायचं
तर त्याकरता सगळे कपडे, पुस्तकं, वस्तु वेगवेगळ्या ढिगा-यात समोर रचा. 
मग एक एक कपडा, पुस्तक, वस्तु हातात घ्या, निरखा, विचार करा. तुम्हाला खरंच हवी आहे का ही
या वस्तुकडे पाहिल्यावर मनात आनंदाची भावना निर्माण होत आहे का? असेल तर ठेवा. नसेल तर टाकून द्या.

अजून एक पसारा, अडगळ आवरण्याची पद्धत म्हणजे चार खोक्यांवर नावं लिहा- ठेवणे, टाकून देणे, गरजूला देणे, नंतर ठरवणे. 
आणि मग ही चारही खोकी घरातल्या प्रत्येक कपाटासमोर, टेबलासमोर, साठवणुकीच्या जागेसमोर फ़िरवा. 
ती भरली की मग पुन्हा एकदा घर लावा. 
अर्थात ठेवणेनाव लिहिलेल्या खोक्यात जास्त वस्तु भरल्या गेल्या तर मात्र ही पद्धत तुमच्याकरता उपयोगाची नाही.

अजून एक सोपी पण काहीशी दीर्घ पद्धत म्हणजे रोज एक वस्तु टाकून देणे किंवा देऊन टाकणे. 
अर्थातच यात नव्याने खरेदी करुन रिकामी जागा लगेच भरण्याचा पर्यात उपलब्ध नाही. 
त्याकरता संकल्पाच्या यादीमधे सर्वात वर गरज नसताना खरेदी न करण्याचा, सेलच्या जाहिरातींना बळी न पडण्याचा, वस्तु न साठवण्याचा निश्चय लिहा.

मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजेच कमीतकमी वस्तुंच्या सहायाने, अडगळीवाचून आयुष्य जगणे ही एक सुंदर, सहज, सोपी, पर्यावरणस्नेही जीवनशैली आहे. आयुष्य समृद्ध करणारी. 
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच तिचे तुमच्या जीवनात स्वागत करा.

“There are two ways to be rich: One is by acquiring much, and the other is by desiring little.”

  

लोकमत दैनिकाच्या 'मंथन' पुरवणीच्या कॉलममधे या ब्लॉगवरच्या सर्व पोस्ट्स प्रकाशित झालेल्या आहेत. 

स्त्रिया आणि मिनिमलिझम- दोन

आपण स्त्री असल्याने आपल्याला आपणच जमवलेला आपल्या सभोवतालचा इतका मोठा पसारा, माणसांचा, भावनांचा आणि अर्थातच वस्तुंचा, आवरणं काही शक्य नाही, त्या पसा-यावाचून एकांडेपणाने जगणं आपल्याला जमणार नाही, त्यामुळे आपण मिनिमलिझमपासून लांबच राहिलेले बरं असं म्हणत, मिनिमलिझमची तत्वे, त्यांची आपल्या आयुष्यातली आवश्यकता पटूनही ज्या स्त्रिया त्यापासून दूर रहातात, त्यांच्याकरता कर्टनी कार्व्हरने ’विमेन कॅन बी मिनिमलिस्ट टू’ हा ब्लॉग सुरु केला. 

मिनिमलिझम हा वस्तुंपेक्षाही दृष्टीकोनाशी जास्त निगडीत आहे असं ठाम मत असणा-या कर्टनीच्या मते स्त्रिया आपल्या भोवती वस्तुंचा जितका पसारा साठवतात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मनात साशंकता आणि भिती यांची अडगळ सांभाळून असतात. 
कोणतीही नवी गोष्ट अथवा तत्व स्विकारायची वेळ आली की स्त्रिया तो उपसायला लागतात.
जसे की-
आपल्याला आता खूप उशीर झाला आहे हे सुरु करायला.
कुटुंबातले लोक, मित्र-मैत्रीणी काय विचार करतील
आपल्या व्यस्त दिनक्रमामधून याकरता वेळ कसा काढायचा
आपल्याला हे जगावेगळं काहीतरी करावसं वाटत आहे याचा अपराधीपणा
सवयीच्या वागण्यापासून लांब जाण्याची भिती

अशा असंख्य अडगळीचं ओझं स्त्रिया मनावर वागवतात. त्यांना हे ओझं फ़ेकून द्यायला प्रेरित करावं हा उद्देश कर्टनीच्या मनात होता. 
त्याकरता प्रत्यक्ष ज्या स्त्रिया मिनिमलिस्ट जगत आहेत त्यांचे अनुभव तिने संकलित केले. डिक्लटरिंग आणि मिनिमलिझमच्या टीप्स देणे हा हेतू त्यात नाही. मिनिमलिस्ट जीवनशैलीमधे आपल्या कुटुंबियांना, परिचितांनाही कसे सामावून घ्यायचे हे त्यातून मुख्यत्वे शिकता येते. 

सामान पाठीवर लादून जगभर हवे तेव्हा फ़िरता यावे हा ’पुरुषी’ स्वकेंद्रित दृष्टीकोन स्त्रियांच्या मिनिमलिझममधे नाही. स्त्रियाचा मिनिमलिझमकडे बघणारा दृष्टीकोन सर्वसमावेशक आहे. 
कुटुंब केंद्रस्थानी असणारा तिचा हा परिघ पर्यावरणाला कवेत घेत विस्तारत जातो.

मिनिमलिझमकडे वळणा-या स्त्रियांमधे सिंगल मदर्सची संख्या सर्वात जास्त असते, कारण गरजेपोटी, आर्थिक चणचणीवर उपाय म्हणून त्या मिनिमलिस्ट होतात हा एक सर्वसाधारण प्रवाद कर्टनीने संकलित केलेल्या मिनिमलिस्ट स्त्रियांच्या अनुभवांवरुन सहज खोडला जातो. 
भल्यामोठ्या कुटुंबात वाढलेल्या आणि युनिव्हर्सिटीत शिकायला बाहेर पडलेल्या सतरा वर्षांच्या रोझपासून न्यूयॉर्कमधे स्वत:चा स्कल्प्चर स्टुडिओ असणा-या एवलिनपर्यंत, एकुलती एक मुलगी म्हणून लाडाकोडात, खोलीभरुन कपडे आणि खेळण्यांच्या पसा-यात वाढलेल्या ओक्लाहोमाच्या सारा पासून चायना टाऊनमधे दोन खणी घरात रहाणा-या सिंगापूरच्या नोरापर्यंत अनेक जणी आयुष्य सोपे, सुंदर करण्याकरता मिनिमलिझमकडे वळल्या आहेत. 

स्वच्छता, सौंदर्य यांची उपजतच आवड स्त्रियांमधे असते, मुलींना उत्कृष्ट गृहिणी बनण्याचे ट्रेनिंग घराघरांमधून दिलं जात असल्याने मिनिमलिझम हा तिच्या दृष्टीने टापटिपीने आयुष्य जगण्यापेक्षा फ़ार वेगळं मुळातच नसतं, मात्र त्याही पलिकडे जाऊन जेव्हा आपल्या घरातली स्त्री जेव्हा जाणीवपूर्वक मिनिमलिझम कडे वळते, मिनिमलिस्ट जीवनशैली कुटुंबियांमधे रुजवू पहाते तेव्हा तिला कुटुंबाचा सपोर्ट मिळतो का, या मुलभूत प्रश्नाचे उत्तर मात्र नकारात्मक येते. 

’रिअल लाइफ़ मिनिमलिस्ट’ जेनचा अनुभव या बाबतीत प्रातिनिधिक ठरावा. 
जेनचे सासरचे घर भलेमोठे, अनेक खोल्या, त्यात भरपूर फ़र्निचर, कपाटे आणि त्यातून ओसंडून वहाणारे सामान. आजीच्या मृत्यूनंतर जेन आणि तिच्या नव-याकडे हे वडिलोपार्जित घर वारसाहक्काने आले त्यातल्या जुन्या सामानासकट. कित्येक दशके कुणाचा हातही न लागलेल्या वस्तू, कपडे जेनने आवरायला काढल्या, गरजूंना वापरता येतील म्हणून तिने त्या खोक्यांमधे भरल्या. 
मात्र जेनच्या नव-याने आपल्या आजीच्या एकाही वस्तूला तिला हात लावता येणार नाही असे बजावले. अडगळीने भरलेल्या घरामधे रहाण्यापेक्षा जेनने मग स्वतंत्रपणे लहानशा अपार्टमेंटमधे रहाण्याचा पर्याय निवडला.

मार्थाची सासू वस्तु संग्राहक होती. खरेदीचे तिला व्यसन होते. सासू आजारी पडल्यावर मार्था तिची शुश्रूषा करण्याकरता आपल्या सासरच्या घरी गेली तेव्हा शेकडो पर्सेस, शूज, कपडे, सजावटीच्या वस्तू यांनी कपाटे भरलेली होती. मिनिमलिस्ट मार्थाने सासूची देखभाल करत असतानाच तिच्या घरातला हा पसारा आवरण्याचे, आणि तब्येत सुधारल्यावर सासूला तिच्या संग्राहक वृत्तीतून, वस्तू खरेदी करत रहाण्याच्या व्यसनातून सोडवण्याचे आव्हान स्विकारले. 
मार्थाला याकरता तीन वर्षे लागली. खरेदीचे व्यसन सुटणे अवघड होते, मात्र त्याकरता मार्थाच्या मदतीला तिच्या सासूचा जुना, आता विस्मरणात गेलेला छंद आला. टेराकोटाची भांडी बनवण्याच्या तिच्या छंदाचे मार्थाने पुनरुज्जीवन केले. 
आता पाच वर्षांनंतर सासूला पुन्हा भेटायला गेल्यावर तिच्या स्वच्छ, सुंदर, प्रकाशित घरामधे टेराकोटाच्या कलात्मक वस्तुंचा पसारा पाहून मार्थाच्या डोळ्यात पाणी आले. 

मार्था लिहिते- “व्हिक्टोरियाने, म्हणजे माझ्या सासूने मिनिमलिझमचा संपूर्ण स्विकार केल्याचे मला जाणवले जेव्हा मी तिची टेराकोटाची भांडी पाहिली. त्यांचा आकार, रंग, त्यावरचे डिझाईनही मिनिमलिस्ट शैलीतले होते.”

मिनिमलिस्ट दृष्टीकोन तुमच्या जीवनशैलीमधेच नाही, तर तुमच्या वृत्तीमधे, व्यक्तिमत्वामधे, तुमच्या हातातल्या कलेमधेही किती सहज झिरपतो याचे हे उदाहरण. 

चित्रकला, शिल्पकला या क्षेत्रांमधे कार्यरत असलेल्या मिनिमलिस्ट स्त्रियांना या संदर्भात काय सांगायचे आहे, त्यांच्या कलाकृतींमधून दिसणारा मिनिमलिझम त्यांच्या जीवनशैलीविषयी काय भाष्य करतो याबद्दल आपण पाहूया पुढच्या भागामधे-          



स्त्रिया आणि मिनिमलिझम

स्त्रिया आणि मिनिमलिझम या दोन गोष्टी एकत्र येणे हे पुरुषांच्या तुलनेत अतिशय अवघड असा एक (गैर) समज आढळतो.
कदाचित स्त्रियांना खरेदीची जास्त आवड असते, त्यांना वस्तु साठवून ठेवायला आवडतात, वस्तु टाकून द्यायला त्या नाखुश असतात, घरातल्या जुन्या वस्तू, भांडी, कपडे यांच्यात त्यांची भावनिक गुंतवणूक जास्त असते वगैरे जनरलीच अनेकांच्या मनात असलेले समज स्त्रिया आणि मिनिमलिझम एकत्र नांदू शकत नाही किंवा स्त्रिया मिनिमलिझमकडे स्वत:हून वळणे दुर्मिळ या गृहितकाला कारणीभूत असू शकतात.

खरंच तसं असतं का?

गेल्या दहा वर्षांमधे नव्याने पुनरुज्जीवीत झालेल्या मिनिमलिझम चळवळीमधे किती स्त्रिया आहेत पुरुषांच्या तुलनेत असा एक ढोबळ अभ्यास केला तरी हा समज किती निराधार आहे हे सहज लक्षात येते.

द मिनिमलिस्ट वुमन हा ब्लॉग गेली अनेक वर्षं चालवणारी मेग वुल्फ़ आणि तिच्या ब्लॉग साखळीत जोडल्या गेलेल्या अनेक स्त्रिया आणि त्यांचे मिनिमलिझमचे अनुभव, विचार हेच सिद्ध करतात की स्त्रिया अतिशय सहजतेने मिनिमलिझमच्या तत्वांना आपलेसे करु शकतात.

मुळातच झेन तत्वद्न्यानाची आवड असणा-या मेग वोल्फ़ला मिनिमलिझम हा स्वत:च्या घराकरता आणि व्यवसायाकरता उपयुक्त वाटलाच शिवाय त्यामुळे आपण भावनिकदृष्ट्याही जास्त सक्षम आणि कार्यशिल बनत चालल्याचे तिच्या लक्षात आले.
मेगच्या मते स्त्रिया जास्त खरेदी करतात, वस्तुंमधे गुंततात, आपल्या आसपास आवडत्या गोष्टींचा पसारा असणे त्यांना आवडते या कशाही पेक्षा जास्त महत्वाचे एक गोष्ट त्यांच्याजवळ असते, जी मिनिमलिझमच्या दृष्टीने आत्यंतिक गरजेची, ती म्हणजे मुव्हिंग ऑन’.
दु:खद, नकोशा, त्रासदायक आठवणींना, परिस्थितीला मागे टाकून त्या अतिशय सहजतेनं आयुष्यात पुढे जाऊ शकतात. आपले आयुष्य नव्याने सुरु करु शकतात. शिवाय परिस्थितीशी, वातावरणाशी तडजोड करण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असते. एकदा जे ठरवलं आहे ते पार पाडण्याचा किंवा त्यानुसार वागण्याचा निग्रहही त्यांच्यात जास्त असतो.

मिनिमलिझम हा वैयक्तिक पातळीवर यशस्वी करुन दाखवणारे स्त्री आणि पुरुष यांच्या आकडेवारीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन मिनिमलिझम अंगिकारणे किती जणांना शक्य झाले.
याबाबतीत स्त्रिया नि:संशयपणे पुरुषांपेक्षा जास्त संख्येने यशस्वी झाल्या आहेत आजवर.
एक स्त्री शिकली की सारे घर शिकते या गृहितकालाच पुढे नेणारी ही गोष्ट आहे.

क्रिस्तिन बोसिल या स्विडिश गृहिणीचे याबाबतीतले अनुभव महत्वाचे आहेत.
द मिनिमलिस्ट वुमनया ब्लॉगवरच्या गेस्टपोस्टमधे तिने आपल्या तीन मुले, एक मुलगी आणि नवरा या कुटुंबामधे मिनिमलिझम कसा रुजवला हे लिहिले आहे.
क्रिस्तिनच्या मते सर्वात कठीण भाग होता मुलांना खेळणी आणणे कमी करणे/बंद करणे. मनाला गिल्ट देणारा हा प्रकार होता. आपण पैसे कमावतो ते मुलांना सुखी आयुष्य देणे शक्य व्हावे याकरता आणि तिच्या मते सुखी आयुष्याची संकल्पना अनेकदा भरपूर खेळणी आणून देणे इथवरच ती अनेक पालक सिमीत ठेवतात.
मुलांना सारखेच काही ना काही तरी नवे हवे असते आपले मन रमवायला. पण त्याकरता त्यांना खेळणीच लागतात असे नाही हे क्रिस्तिन आवर्जून सांगते.
मुलांना आपल्यातल्या उर्जेला, कल्पनाशक्तीला, क्रिएटीव्हिटीला वाव हवा असतो. बाजारातून आयत्या आणलेल्या महागड्या खेळांमधे ही क्षमता नक्कीच असते. पण पालकांनी जर आपली स्वत:ची कल्पनाशक्ती, क्रिएटीव्हिटी आणि बौद्धिक क्षमता वापरली तर मुलांची ही गरज घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तुंमधून सहज भागवली जाऊ शकते. मुलं ते जास्त एन्जॉय करतात.
क्रिस्तिनने सुरुवात केली आपल्या मुलीला बाहुली आणि बाहुलीचे घर बनवून देण्यापासून.
तिच्या आठवणीत आपल्या लहानपणी पाहिलेली तिच्या आजीच्या लहानपणातली एक चिंध्यांपासून बनवलेली कापडी बाहुली होती.
क्रिस्तिनने जुन्या, रंगीत कापडांच्या तुकड्यांमधून तशीच एक बाहुली मुलीकरता बनवली. त्यात मुलीला लहान झालेल्या तिच्या आवडत्या ड्रेसेसचे तुकडे जोडलेले होते.
ते पाहून मुलगी इतकी खूश झाली की आपल्या इतर सगळ्या महागड्या बाहुल्या आणि खेळ सोडून ती त्यातच रमली.
मुलीने मग स्वत: क्रिस्तिनच्या मदतीने त्या बाहुलीसारख्या इतर बाहुल्या, स्टफ़्ड टॉइज इत्यादी आपल्या वॉर्डरोबमधल्या सामुग्रीला वापरुन बनवल्या. शाळेतल्या मित्र-मैत्रीणींपर्यंत हे कापडी बाहुल्यांचे लोण पसरले.

त्यानंतर मग क्रिस्तिन आणि तिच्या नव-याने घरातल्या वस्तुंमधून चेंडू, पंचबॅग बनवल्या. वर्तमानपत्रे आणि रंगित मासिकांमधून पझल्स बनवली, शब्दकोडी तयार केली.
कम्युनिटीतल्या इतर पालकांकरता क्रिस्तिन आणि तिचा नवरा मोफ़त प्रशिक्षण वर्गही चालवतात या घरगुती खेळण्यांच्या निर्मितीसंदर्भात.

मुलांना भरपूर खेळणी आणि वस्तु, कपडे आणण्याची सवय आपणच लावलेली असते, ती मोडायला आपल्याला जरा जास्त कष्ट, वेळ द्यावा लागतो, त्यामुळे क्रिस्तिनच्या मते तिच्या मिनिमलिझम स्विकारण्याच्या आव्हानातला हा सर्वात कठीण आणि सर्वात मनोरंजक भाग.
एकदा हे आव्हान पार पडल्यावर कपड्यांच्या पुनर्वापर, चारचाकी वाहनाचा कमीतकमी वापर करुन सायकलची किंवा पायी चालण्याची सवय लावणे, बाजारातले विकतचे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणण्या ऐवजी घरीच केलेले साधे, पौष्टीक अन्न खाणे, आपल्या घराच्या अंगणामधे भाज्या, फ़ळे लावणे, वीकेन्ड्सना सहलीकरता ठिकाण निवडताना थीम पार्क्स किंवा महागड्या पर्यटनस्थळांच्या ऐवजी समुद्र किनारे, वस्तु-संग्रहालये, सार्वजनिक बागांमधे कुटुंबासहित जाणे, पुस्तके विकत आणण्यापेक्षा गावातल्या समृद्ध लायब्ररीचा वापर करण्याची सवय लावणे अशा अनेक गोष्टी क्रिस्तिनने केल्या आणि त्या सर्वच्या सर्व यशस्वी झाल्या.
वेळ नक्कीच लागला पण एकदा सहकार्य मिळायला लागल्यावर गोष्टी फ़ारच आनंददायक आणि सोप्या होत गेल्या.

द मिनिमलिस्ट वुमनची ब्लॉगलेखिका मेग वुल्फ़ हिने मिनिमलिझम आणि स्त्रिया या संदर्भातले आपले अनुभव आणि विचार मांडले आहेत.

पर्यावरण आणि मिनिमलिझम या हातात हात घालून चालणा-या दोन गोष्टींशी स्त्रियांचा कायमच फ़ार जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबध कसा आहे हे त्यातून स्पष्ट होत जाते. पुढच्या भागांमधे त्याबद्दल जाणून घेता येईल.


प्रत्येकाचा मिनिमलिझम

न्यूयॉर्क शहरामधे एका मोठ्या फ़ायनान्स कंपनीमधे मोठ्या पदावर नोकरी करणारा रॉथ आणि जाहिरात संस्थेमधे काम करणारी त्याची बायको लेना जवळच्या उपनगरामधे एका दोन खणी, लहानशा अपार्टमेन्टमधे रहातत. 
एरवी अमेरिकन घरं सामान सुमानाने ठासून भरलेली असतात, अगदी अशी लहान अपार्टमेंट्सही. 
पण हे घर अगदी बेसिक, आवश्यक तेवढेच फ़र्निचर असलेले, क्लोजेटमधेही मोजकेच, ऑफ़िसला लागतील असे फ़ॉर्मल आणि काही साधे कपडे. बाकी पसाराही अगदीच आटोपशीर. 
ऑफ़िसला जातानाही ते पब्लिक ट्रान्स्पोर्टचा वापर करतात. 

पन्नाशीतल्या रॉथ आणि लेनाचे हे आजचे सुटसुटीत आयुष्य गेल्या चार वर्षांमधले. 
या आधी ते आपल्या दोन मुलांसहित उपनगरामधे मोठ्या, दुमजली घरात, भरपूर फ़र्निचर, मॉडर्न गॅजेट्स, लेटेस्ट गाड्यांसहित रहात होते. 
दोन्ही मुले मोठी होऊन शिक्षणाकरता बाहेर पडल्यावर दोघांना एवढा मोठा पसारा झेपेनासा झाला, गरजेचाही वाटेनासा झाला, करिअरची जबाबदारीही वाढली होती, त्यामुळे मग त्यांनी कामाच्या ठिकाणाच्या जवळ लहान जागेमधे आपापला आटोपशिर संसार थाटला.

लहान जागेमधे रहायला लागल्यावर रॉथला जाणवले वयाची इतकी वर्षे आपण एवढा मोठा पसारा भोवताली जमवून ठेवला होता तो नेमका कशासाठी? मिनिमलिझमकडे आपण यापूर्वीच वळायला हवे होते. 
काही जण गरज म्हणून, काही अपघाताने, काही जाणीवपूर्वक मिनिमलिझमकडे वळतात आणि मग मिनिमलिस्ट जीवनशैलीचे फ़ायदे लक्षात आल्यावर हे आपण आधीच का केले नाही असं त्या सर्वांनाच वाटतं. त्यामुळे रॉथच्या मनातली भावना काही नवी नाही.

लहान जागेत रहायला येण्या आधी आधीच्या मोठ्या घरातील सामानाची ते काढून टाकायच्या आधी केलेली लहान मोठ्या वस्तुंची असंख्य पानांची यादी रॉथने अजूनही जपून ठेवली आहे. 
त्याच्या सध्याच्या घरातल्या सामानाची संख्य अर्ध्या पानात संपते.

मात्र रॉथ अजूनही स्वत:ला आपण मिनिमलिस्ट म्हणवून घेत नाही. 
व्यक्तिगत वेळ आणि पैसा वाचणे हे नक्कीच झाले मात्र मिनिमलिस्ट जीवनशैली ही पूर्णपणे पर्यावरण स्नेही असणेच आवश्यक आहे असे त्याचे मत. 
आता तो कमी सामानामधे, लहान घरात रहात असला तरी असं रहाताना त्याला ज्या तडजोडी करायला लागल्या, नव्या सोयी, सुविधा बनवायला लागल्या त्यांचा विचार करता आपले जगणे पर्यावरण स्नेही नाही हे तो प्रामाणिकपणे कबूल करतो. 
उदाहरणार्थ घरातली शेकडो पुस्तके काढून टाकून किन्डल सारखे इलेक्ट्रॉनिक बुक रिडर घेणे ही गोष्ट म्हणजे मिनिमलिझम नाही. ती सोय झाली. 
जगण्यातला एकंदर पसाराच काढून टाकणे जमायला हवे, जे मला अजूनही जमलेले नाही. मिनिमलिझम हा ग्राहक संस्कृतीला खतपाणी घालणा-या वृत्तीच्या विरोधात आहे, मात्र आपण अजूनही लहान प्रमाणातला ग्राहकच आहोत हे रॉथ नाकारु शकत नाही. 

शंभर वस्तुंच्या जागी दहा वस्तू खरेदी करणे म्हणजेच फ़क्त मिनिमलिझम नाही. 
काहीही जास्तीचेकिंवा गरज नसतानाजमवलेले मिनिमलिझमच्या तत्वात बसू शकत नाही. गरज नसताना कमावलेला जास्तीचा पैसा तुम्ही वस्तू विकत घेण्यावर खर्च न करता जर नुसताच बॅन्केमधे साठवून ठेवणार असाल तर ते जास्त हानीकारक.

रॉथ स्वत:ला भौतिक मिनिमलिस्ट म्हणवून घेत्तो. 
मानसिक किंवा अध्यात्मिक पातळीवरील मिनिमलिझमपासून आपण अजून खूप दूर आहोत पण ही सुरुवात आहे हे त्याला माहित आहे. 
मिनिमलिझमची तत्वे नेमकी काय ते लोकांनी खोलात जाऊन समजावून घ्यायला हवी. 
रॉथच्या मते मिनिमलिझममधे जग बदलून टाकायची ताकद आहे, त्यामुळे त्याचा प्रसार योग्य प्रकारे, खरेपणानेच व्हायला हवा. रॉथला स्वत:ला असा विचार करणे, त्यानुसार वागणे जमलेले नाही. 

उदाहरणार्थ वाचवलेल्या वेळाचे, पैशांचे आपण नेमके काय करणार आहोत याचा विचार. 
अनेकजण प्रवास करणार असे म्हणतात. मात्र हा प्रवास कसा असणार आहे, नुसतीच मौजमजा, क्रूझची सहल, पर्यटनस्थळांचे फोटोग्राफ़्स, खरेदी असे असेल तर ते मिनिमलिझम तत्वात बसत नाही आणि त्यात पर्यावरण स्नेह नाही. कमीतकमी सामानात, कमीतकमी इंधनाचा वापर करुन केलेला प्रवास हवा, स्थानिक संस्कृतीला, जनजीवनाला जाणून घेणे हे त्यातून घडणार असेल तर जास्त उत्तम.

आर्टिस्ट एलेना स्मिथ मिनिमलिस्ट आहे मात्र मिनिमलिझमकडे ती कोणत्याही तात्विक अंगाने बघत नाही. 
एलेनाच्या मते मिनिमलिझम हे जीवनविषयक तत्वद्न्यान नसून तो केवळ एक सौंदर्यवादी विचार आहे. आपल्या आजूबाजूचे जग अडगळ नसेल, पसारा नसेल तर जास्त सुंदर दिसते इतकाच विचार मिनिमलिझममधे असावा. नीटनेटक्या, साध्या व्यक्ती आसपासचे जगही सुंदर आणि साधे बनवतात. दृश्यकला, संगीत, वास्तुकला, रचना इत्यादींमधे केलेला मिनिमलिझमचा डोळस वापर हा आपोआपच तुमच्या व्यक्तिमत्वामधे झिरपतो आणि मिनिमलिझम तुमच्या जगण्याचा भाग होतो.

एलेना आणि रॉथ या दोघांशी बोलताना लक्षात आले की मिनिमलिझम कोणत्याही विशिष्ट व्याख्येत किंवा चौकटीमधे बसवणे अवघड आहे.

जगण्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर मिनिमलिझम आपल्याला खूणावतो. त्याच्याकडे यायला प्रवृत्त करतो. प्रत्येकाकरता हा टप्पा वेगळा असू शकतो, मिनिमलिझमचा अर्थही प्रत्येकाकरता वेगळा असू शकतो कारण मुळातच पसा-याच्या, अडगळीच्या कल्पना प्रत्येकाकरता वेगळ्या. 
सरप्लसअसण्याचे मोजमापही प्रत्येकाचे वेगळे. 

मिनिमलिझमभोवती असलेले भावनिकतेचे, सामाजिकतेचे. तत्वद्न्यानाचे अनेक थर ओलांडून आपण त्याच्या गाभ्यापर्यंत शिरायचा प्रयत्न करायला हवा, आपल्याकरता मिनिमलिझम नेमका काय आहे, आपल्याला तो का हवा आहे आपल्या आयुष्यात याचा विचार करायला हवा. 

मिनिमलिझमची व्याख्या आणि चौकट लवचिक नक्कीच आहे मात्र ती सोयिस्कर नसावी.


मॉडरेट मिनिमलिझमचा सुवर्णमध्य

साधेपणाने, कमीत कमी वस्तुंसोबत जगण्यात जो एक अंतर्भुत शांतपणा आहे, सौंदर्य आहे, निसर्गाच्या जवळ जाणे आहे त्याकडे आकर्षित होऊन मिनिमलिस्टजीवनशैलीकडे माणसे वर्षानुवर्षे, पिढ्यान पिढ्या वळत राहिली.
मिनिमलिझमचे विचार, साधने, शिकवण पिढ्या, संस्कृतीनुसार बदलत राहिली पण त्यामागची मुळ तत्वे सारखीच होती.
आपल्या मुळांकडे, जगण्यातल्या सोपेपणाकडे वळण्याचे मानवामधले मुलभूत आकर्षण मिनिमलिझम विचारसरणीमधून प्रतिबिंबित होत राहिले.
प्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमधे मिनिमलिझमचे उदयास्त होत राहिले.
माणसांच्या जीवनशैलीमधे, संगितापासून ते साहित्य, कलेमधे मिनिमलिझमच्या पाऊलखूणा उमटत राहिल्या.

आधुनिक जगात तर हे आकर्षण किती तीव्र झाले, त्याकरता नवनवीन वाटा कशा आणि कोणत्या शोधल्या गेल्या, जाताहेत हे आपण पाहिलेच आहे.
लहान, साधी घरे बांधून त्यात केवळ जीवनावश्यक वस्तुंसोबत जगणे असो, पर्यावरणप्रेमी जीवनशैली अंगिकारणे असो, झेन तत्वांचा वापर असो, पाठीवरच्या पिशवीत मावेल इतकेच सामान सोबत घेऊन जगभरात भटकणे असो, चैनीच्या वस्तू, खरेदीचा त्याग करणे असो.. अनेक पद्धती, अनेक कहाण्या..

साधेपणाने, अडगळविरहित जगण्यात असे काहितरी विलक्षण प्रेरणादायी आहे ज्याचे प्रत्येक थरातल्या, संस्कृतीतल्या माणसाला सातत्याने आकर्षण वाटत राहिले. पैसे वाचणे, वेळ वाचणे अशा भौतिक फ़ायद्यांपासून ते मन:शांती, एकाग्रता वाढणे अशा मानसिक फ़ायद्यांपर्यंत अनेक असल्याने त्याचा स्विकार होत राहिला.
जगण्याचा झगडा ते अति मुबलकता या दोन टोकांच्या दरम्यान हा मिनिमलिझम सातत्याने हेलकावत राहिला.

अती समृद्धी, चैनीतून मग पुन्हा साधेपणाकडे परत वळावेसे वाटणे, जाहिरातींच्या मा-यात, मार्केटींगच्या भुलभुलैयात सरभरलेल्या मनावर नको झालेल्या, जागण्यात अडगळ वाटू शकणा-या वस्तुचे ओझे असहनीय झाल्यावर मिनिमलिझमचा शांत, साधा रस्ता माणसाला निर्वाणाकडे नेणारा वाटणे हे साहजिकच.

अर्थात असे सर्वांनाच वाटले नाही.

कोणत्याच पिढीत, कोणत्याच संस्कृतीत मिनिमलिझम सर्वार्थाने स्विकारला गेला नाही.

मिनिमलिझम काही वर्षांनंतर, पिढ्यांनंतर पुन्हा पुन्हा डोकं वर काढत राहिला, याचाच अर्थ तो वेळोवेळी अस्तंगतही होत राहिला.
कन्झुमेरिझम पुन्हा पुन्हा मिनिमलिझमवर मात करत राहिला.

मिनिमलिझमचा विचार समाजातल्या सर्व स्तरांमधे कधीही सार्वत्रिकतेनं का स्विकारला गेला नाही याचीही कारणे पहाणे गरजेचे ठरते.

मिनिमलिझम सार्वत्रिकरित्या स्विकारला न जाण्याचे मुलभूत कारण अर्थातच आर्थिक असमतोल आणि त्यातून रुजणारी भिन्न सामाजिक मानसिकता.

माझ्याकडचे शंभर शर्ट्स, हजार पुस्तके, हजार स्क्वेअर फ़ूट घरातलं दोन ट्रकांमधे मावेल इतकं सामान कमी करुन आता मी फ़क्त पाच शर्ट्स, दहा पुस्तकं आणि पिशवीत मावेल इतक्याच सामानावर दीडशे स्क्वेअर फ़ूट जागेमधे रहातो आहे असं एखाद्याने मिनिमलिस्ट जीवनशैली जगायचे ठरवल्यावर लिहिणे हे त्या व्यक्तीच्या दृष्टीने खरोखरच कष्टसाध्य आणि कौतुकास पात्र असणारे ठरत असले तरी अनेक बेघर, गरीब स्तरातील व्यक्तींच्या तुलनेत असे मिनिमलिस्ट अवस्थेतील जगणेही चैन ठरु शकते.
जीवनावश्यक वस्तु ही संकल्पना अनेकदा सापेक्ष असते. त्यामुळे मिनिमलिझमची चळवळ अनेकांच्या दृष्टीने स्टंटबाजीकिंवा फ़ॅडअशा अर्थाने घेतली गेली.

मिनिमलिझम ही संकल्पना मुबलकतेच्या अतिरेकातून आली असल्याने त्याचा वापर समाजाच्या एका विशिष्ट स्तरापर्यंतच मर्यादित असतो, मिनिमलिझम संकल्पना हा श्रीमंत, जास्त पर्याय निवडण्याची मुभा असलेल्यांकरताच आहे आणि आर्थिक दृष्ट्या गरीब गटाला मिनिमलिझमची गरजच नाही, कारण अभावात साधे जगायला लागणे ही मजबुरी असते. त्यामुळे या स्तरामधे मिनिमलिझमची गरजच नाही.

अशी ही समजूत हा मुळातच एक महत्वाचा गैरसमज आहे.

तुमच्या जवळ असलेल्या वस्तु हा मिनिमलिझमच्या गरजेचा मानक नाही.

गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाला अनेकदा स्वस्त किंमतीच्या अनेक लहान सहान वस्तु जवळ बाळगाव्या लागतात, त्या लवकर खराब होत असल्याने त्यांची खरेदी वारंवार होत रहाते. त्या उलट श्रीमंत व्यक्ती कमी संख्येच्या पण अधिक किमतीच्या वस्तू दीर्घकाळ टिकणा-या वापरु शकते. त्यांना वस्तुंचा साठा करुन ठेवण्याचीही आवश्यकता नसते.

ग्राहककेंद्रित समाजामधे, जाहिरातींच्या भडिमाराचा सर्वाधिक परिणाम होणारा वर्ग हा आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरावरचाच असतो. आपल्याला परवडू न शकणा-या, हव्याश्या वाटणा-या वस्तुंचा सातत्याने केला जाणारा त्यांच्या मनातला विचार हा प्रसंगी जीवनावश्यक गरजा बाजूला सारुन चैनीच्या वस्तु जमवण्याच्या मागे लागण्याइतका प्रबळ ठरतो.
टिकावू पण महाग वस्तु न परवडल्याने हा वर्ग स्वस्त, तकलादू वस्तुंच्या बाजारपेठेच्या जाळ्यात अडकतो.
मिनिमलिझमची संकल्पना त्याकरताच जरा वेगळ्या पद्धतीने पण मुळच्या गाभ्याला धक्का न लागता या वर्गापर्यंत पोचवणेही तितक्याच गरजेचे आहे.

साधेपणाचे तत्व स्विकारुन भौतिक सुखांचा, चैनीच्या वस्तुंचा त्याग करुन आयुष्य सोपेपणाने, साधेपणाने जगणारे अनेक जण वेगवेगळ्या संस्कृतींमधे पहायला मिळतात. मात्र ते कायमच अपवाद ठरलेले आहेत.

चैनीच्या, सुखकारक वस्तु आजूबाजूला विखरुन असताना, त्या विकत घेणे सहजसाध्य असताना त्यांच्याकडे पाठ फ़िरवून साधे जगायला खूप मोठा मनोनिग्रह लागतो, ते जास्त कष्टप्रद आहे.
शिवाय गरज नसलेल्या वस्तुंचा तुम्ही त्याग करा असं सांगणं सोपं आहे, पण माणसांची मनं त्यात गुंतलेली असतात, वस्तु टाकून दिल्यावरही अनेकदा ते त्याचाच विचार करत रहातात, त्यामुळे भोवतालची अडगळ दूर झाली तरी मनातली जात नाहीच.

मिनिमलिझमचे तत्व आयुष्यभर निभावणे सोपे नाही. मिनिमलिझमकडे स्वत:हून वळलेल्या आणि या विचारसरणीशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या व्यक्ती मोजक्याच आहेत.

संन्यस्त वृत्ती स्विकारणे हे या साधेपणाचा अध्यात्मिक टोक. अर्थातच ते संसाराचा पसारा मुळातच फ़ार न मांडलेल्यांनाच साध्य.
मिनिमलिझम ही संकल्पना त्या अर्थाने व्यक्तिवादी ठरते.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या संकल्पनेचा स्विकार मान्य असेलच असे नाही. आणि तशी ती नसेल तर मिनिमलिझम लादणे हा फ़ार मोठा अन्याय, तिचा टिकावही अशक्य.
आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त सुखसोयी पुरवण्याचा प्रयत्न करण्याच्या मुलभूत मानवी प्रेरणेच्या विरोधात जाणारी मिनिमलिझम संकल्पना आहे असं अनेकांना वाटतं.

आद्य मिनिमलिस्ट म्हणून ज्याचे नाव घेतले जाते ते हेन्री डेव्हिड थोरो ज्याने आपल्या आयुष्याचा बराचसा उत्तरार्ध वाल्डेनच्या तळ्याकाठी, एका लहानशा घरामधे, गरजेपुरत्या वस्तुंच्या सोबतीने एकांतात व्यतित केला तोही नंतर बरीच वर्षे आपल्या पिढीजात, भल्यामोठ्या, सुखसोयींनी युक्त अशा घरामधे घालवल्याचे इतिहास सांगतो.

म्हणजे मग मिनिमलिझम हा आपण असेही जगू शकतो इतक्याच साध्यापुरता मर्यादित ठेवायचा का?
आयुष्यभर हे व्रत निभावणं विनाजबाबदारी, स्वतंत्र, एकटेपणाने रहाणा-यांनाच जमू शकत असेल का?

मॉडरेट मिनिमलिझम या विषयावर जगभरात अनेक ठिकाणी, प्रसंगी स्वखर्चानेही व्याख्यानमाला चालवणारा स्विडिश अमेरिकन जोनार्द स्किलेट यासंदर्भात सुरेख विवेचन करतो.
माणसाला आपल्यासोबतच्या प्रत्येक वस्तुसोबत संवाद साधता यायला हवा. नाते जोडता यायला हवे. तितक्याच वस्तु सोबत असू द्या. जोनार्द सल्ला देतो की वस्तु खरेदी करताना तिची आपल्याला असलेली गरज, तिचा टिकावूपणा, आपल्यासोबत ती जास्तीत जास्त वर्षं कशी काढू शकेल हा विचार करता यायला हवा. त्याकरता वस्तुची नीट काळजी घेणंही शिकून घ्यावं. वस्तुच्या पुनर्वापराचे धडे सातत्याने गिरवायला हवे.  

ग्राहक-संस्कृतिचा, खरेदीचा अतिरेक आणि त्याचा एकंदरीतच पर्यावरणावर होणार दुष्परिणाम, नैसर्गिक स्त्रोतांवर पडणारा ताण, विल्हेवाटीची समस्या आणि सर्वात महत्वाचे अधिक कमवा-अधिक खरेदी करा या दुष्टचक्रात अडकल्यावर उद्भवणारा शारिरीक आणि मानसिक तणाव टाळायचा असेल तर मिनिमलिझम संकल्पनेला शरण जाण्यावाचून पर्याय नाही या विचाराला पाठिंबा देणारी आणि त्याचा प्रतिवाद करणारी मतं टोकाची असू शकतात पण दोन्हींचा मध्य साधण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवण्यावाचून सध्या तरी पर्याय नाहीच.