Tuesday, March 14, 2017

’स्टोरी ऑफ़ स्टफ़’

मुंबईत या सीझनला असंख्य हस्तमागाची प्रदर्शने भरत असतात. तिकडे वळण्यावाचून पावलांना कसं रोखायचं?
थोरोचं वॉल्डेन पुन्हा आठवतं. पसारा आवरण्यात उर्जा घालवण्यापेक्षा तो कमी करण्यात, पुन्हा निर्माण न करण्यात मन घाला असं तो लिहितो.

हे कसं साधायचं?

याचंही काही शास्त्र आहे, तंत्र आहे. काहींनी प्रयत्नपूर्वक, अनुभवातून साध्य केलेलं. चुका करत, इतरांच्या उदाहरणांवरुन शिकत. अगदी मोजक्या लोकांच्या स्वभावात ते उपजतही असतं.

या महिन्यात मुंबईत आणि इतरही शहरांमधल्या मॉल्समधे डिस्काउन्टची रेलचेल असते. प्रचंड गर्दी उसळते. सारासार विचार हरवून बसलेले लोक. ट्रॅफ़िक जाम. लोक वेडे होऊन धक्काबुक्की करत मॉलमधे घुसतात. कपड्यांचे वस्तुंचे ढिगारे बघता बघता त्या अवाढव्य मॉल्स, डिपार्टमेन्टल स्टोर्समधून लोकांच्या घरांमधे जाऊन बसतात. साचतात. त्यांचे ढिग तयार होतात. जुन्यावर नवे रचले जातात.
प्रत्येकाला वस्तु जमवायचीच गरज वाटते आहे. हाताशी वेळ, पैसा, सोय असताना स्वत:ची गरज, आवड, छंद का पुरवायचा नाही?

मिनिमलिस्ट, गो स्लो लाइफ़ स्टाईलची गरज वाटायला लागणे हे नेमकं कशाचं लक्षण?

फ़ॉर्टी इज न्यू थर्टी, सिक्स्टी इज न्यू फ़ॉर्टी च्या जमान्यात कोणाचंही वयतर कधीच होत नाही. आकर्षक, प्रेझेन्टेबल दिसण्याची, सततच्या नाविन्याची, बदलाची आवड अर्ली टीनएजपासून लेट एटीज पर्यंत विस्तारत गेलेली आहे. त्यात गैर काहीच नाही. पण मग हव्यासाला, वस्तु जमवण्याला बंधारा नक्की कोणत्या मर्यादेत घालण्याची अपेक्षा बाळगायची?
दर सेकंदाला नवे ऑनलाईन दुकान तुमच्यासमोर आकर्षक, हटके वस्तुंची रास परवडणा-या, वाजवी दरात नजरेसमोर ओतली जाते. एक क्लिक फ़क्त. वस्तु घराच्या दारात हजर.

यातून बाहेर मुळात का पडायच?

सहा महिन्यांहून जास्त काळ वस्तु वापरण्याचे घटलेले प्रमाण, काही दशकांपूर्वी जितक्या वस्तु वापरात होत्या त्याहून कितीतरी पट अधिक वस्तु आज वापरात आहेत लोकांच्या. त्यांना त्या घेणं परवडत आहे.
हे चक्र आहे. ते थांबवणं सहज शक्य नाही. सोपं तर नाहीच. मुळात ते थांबवायचं का?

या प्रश्नांची उत्तरे स्टोरी ऑफ़ स्टफ़मधून मिळतात.

स्टोरी ऑफ़ स्टफ़ही अमेरिकन ऎनिमेटेड डॉक्युमेन्टरी. लहानशी, केवळ बावीस मिनिटांची.

ऎन लिओनार्द या अमेरिकन बाईंनी प्रचंड संशोधनानंतर ही छोटीशी पण अतिशय परिणामकारक फ़िल्म डिसेंबर २००७ मधे निर्माण केली. गरज नसताना भारंभार वस्तु खरेदी करत सुटायचे, कचरा वाढवायचा, फ़ेकायचा, पुन्हा जमा करायचा या पाश्चात्य वस्तुवादी जीवनशैलीमागचे अर्थकारण, पर्यावरण, समाज संस्कृतीवर त्याचा होत असलेला परिणाम, त्यावरच्या असलेल्या नसलेल्या उपाययोजनांना समोर आणणारा हा लघुपट.

वस्तुंचे उत्पादन, विनियोग, उपभोग आणि मग त्यांना फ़ेकून देणे या चक्रात नैसर्गिक साधन संपत्तीचा होणारा उपसा, अनेकांचं शोषण, ग्राहक वृत्ती समाजात खोलवर मुरवण्याकरता राजकीय, धंदेवाईक, व्यावसाईक पातळीवर चालणारे प्रयत्न हे सगळं या लघुपटात प्रभावीपणे मांडले गेले आहे.

जगातल्या २२८ भाषांमधे हा लघुपट अनुवादित केला गेला. या लघुपटातून पुढे मालिका निर्माण झाल्या. स्टोरी ऑफ़ बॉटल्ड वॉटर, स्टोरी ऑफ़ कॉस्मेटीक्स, स्टोरी ऑफ़ इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी. अनेकांनी आपल्या कहाण्या, वैयक्तिक पातळीवरचे आपले प्रयत्न ब्लॉगद्वारे या चळवळीला जोडून घेतले.

पहाता पहाता मूव्हीची मूव्हमेन्ट झाली. वस्तुंचा वापर, अतीवापर.. त्यातच भौतिक, आत्मिक समाधान शोधण्याच्या जीवनशैलीला उबगलेल्या असंख्य लोकांनी ही चळवळ पुढे चालवली.
खरेदीचा विस्फ़ोट होणा-या थॅन्क्स गिव्हिंग, ख्रिसमसच्या मेगा डिस्काऊंट सेलच्या विरोधात सुरु झालेल्या ब्लॅक फ़्रायडे, नो शॉपिंग चळवळी, इतरही अनेक लहान मोठ्या चळवळी, उदा. नो सोडा, नो प्रोसेस्ड फ़ूड, नैसर्गिक साधने, वनस्पतींचा वापर करण्याचा प्रचार..
कोणी निसर्गाकडे परत चला म्हणतात, कोणी स्मॉल इज लेस किंवा रिच लाइफ़ विथ लेस स्टफ़ म्हणतात अशा अनेक चळवळी याला जोडल्या गेल्या.
त्यात वैयक्तिक प्रयत्नही अनेक आहेत. साधेपणात समृद्धी मानायला लागलेली सामान्य माणसं. काही आलिशान घरांचा त्याग करुन ५० स्क्वे.फ़ू. घरात, बॅकपॅक मधे मावेल इतक्याच सामानावर रहातात, काही जण एकही लेबलन वापरण्याचे, गरजेच्या अत्यावश्यक वस्तू सोडून काहीच खरेदी न करण्याचे ठरवतात. काटेकोर बजेटवर रहातात, क्रेडिट कार्डचा वापर बंद करतात.

कच-याच्या अतिरेकावर उतारा म्हणून स्विकारली गेलेली ही कचरा-मुक्त जीवनशैली. भौतिक आणि मानसिक कसलाच कचरा ठेवायचा नाही. देउन टाकायचा, फेकून द्यायचा किंवा त्याचा पुनर्वापर करायचा. आहेत ती साधने गरजेपुरतीच रोजच्या आयुष्यात वापरायची. आपली शक्ती, उर्जा जास्त क्रियाशिल, कृतिशिल आणि सर्जनशिल कामांकरता राखून ठेवायची.

ज्यांना प्रश्न पडले त्यांनी ते सोडवण्याचे प्रयत्न केले, काहींना उत्तरे मिळाली, काहींना अजून प्रश्न पडत गेले उत्तरांचा मागोवा घेताना. उत्तर सोपं नाही, एकेरी नाही. रेडीमेड नाही. पण ते आहे. प्रत्येकाकरता ते वेगळं आहे कदाचित. प्रयत्न नेमके काय होते ते जाणून घेणं या घटकेला महत्वाचं.

आजूबाजूच्या, तुमच्या आमच्यांच्या अगदी शेजारी हाताच्या अंतरावर असलेल्यांनीही काही उपाय शोधलेच असतीलच यावर. ज्यांना योग्य समतोल साधता आला ती खरी सुखी लोकं. आपण निदान त्यांनी काय केलं हे जाणून घेऊन चक्रातून पायऊतार होण्याची सुरुवात तरी करु शकतोच.

*’स्टोरी ऑफ़ स्टफ़हा लघुपट आता मराठीतही आणला गेला आहे. इंटरनेटवर पहाण्याकरता तो उपलब्ध आहे.




No comments:

Post a Comment