Tuesday, March 14, 2017

’फ़्रेन्च’ जीवनशैलीचे अनुकरण.

जानेवारी २०१६ मधे फ़ोर्ब्ज- लिडरशिप कार्यक्रमांतर्गत तिशीच्या आतील स्त्रियांची जी परिषद झाली त्यात आम्हाला आमचे आयुष्य सोपे करायचे आहे. हा निर्धार त्यात सहभागी झालेल्या सर्व धडाडीच्या, टॉप करिअरिस्ट तरुण स्त्रियांनी व्यक्त केला. 
त्या ते कसे साध्य करणार आहेत आणि असा निर्धार व्यक्त करण्यामागची त्यांची भूमिका नेमकी काय, यातील अनेकींनी ही साधे आणि सोपेपणाची क्लटरफ़्री जीवनशैली जगायलाही सुरुवात केलेली आहे, त्यांचे स्वानुभव काय हे जाणून घ्यायला हवे.

आयुष्य साधेपणाने जगण्याचं ठरवणे म्हणजे आयुष्य पुरेपूर उपभोगण्याचा हक्क स्वत:ला नाकारणे हा होत नाही का? आयुष्याच्या शर्यतीतून बाहेर पडणं आहे का हे? हा प्रश्न यातल्या अनेकींना वारंवार विचारला गेला.

वस्तुंची खरेदी कमीतकमी करणे, आजूबाजूचा पसारा कमीतकमी करणे याचाच दुसरा अर्थ जीवनातला आनंद, उत्साह कमी करत नेणे असा अनेकांचा समज असतो. अपरिग्रह ही गोष्ट आपणही संन्यस्त वृत्तीशी जोडतच असतो.

प्रत्येकीचे उपाय, मार्ग, उत्तरे वेगवेगळी होती. त्यांच्या आजवरच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर, पुढच्या ठरवलेल्या दिशांवर ते मार्ग, त्यांची उत्तरे बेतलेली. मात्र त्यात एक समान सूत्र आहे.

Their Roaring Thirties: Brutally Honest Career Talk From Women Who Beat The Youth Trap” 
या पुस्तकाची लेखिका डेनिस रेस्तोरी ही त्यांच्यापैकीच एक.

वयाच्या २८ व्या वर्षी डेनिसनी जेव्हा आयुष्यातली गुंतागुंत, तणाव कमी करायचं, साधेपणाने जगायचं ठरवलं तेव्हा तिला आता तू काम करायचं सोडणार का? करिअर सोडून देणार का असं विचारलं गेलं. कारण जर वस्तु खरेदी करायच्याच नाहीत तर पैसे कमवायचेच कशाला? आणि तणावाचे मुख्य कारण करिअरहेच तर असते हा सर्वमान्य दृष्टीकोन.

डेनिसच्या मते नोकरी सोडून देण्याने तिचं आयुष्य सोपं होणार नव्हतं कारण मुळात गुंतागुंतीचं कारण ते नाही. तसं करण्याने उलट तिच्या आयुष्यातला आनंद कमी झाला असता.
उत्तर द्यायला सर्वात कठीण प्रश्न मग आता नेमकं काय करणार?

डेनिसने आयुष्य साधेपणाने घालवायची सुरुवात एका अतिशय सोप्या वाटणा-या पण करायला अत्यंत कठीण गोष्टीपासून केली. तिने आपला वॉर्डरोबतपासला आणि त्यात काही महत्वाचे बदल केले.

त्यातला पहिला होता- कपड्यांच्या बाबतीत आपल्या आजीच्या फ़्रेन्चजीवनशैलीचे अनुकरण. म्हणजेच कपड्यांच्या बाबतीत अतिशय चोखंदळ बनणे. मोजकेच परंतु उच्च अभिरुचीचे कपडे जवळ बाळगणे. जे जास्तीत जास्त टिकतील, कुठेही, कधीही वापरले तरी त्याचा क्लासकमी न होणे.

हे वाचत असताना मला आठवलं कुलाबा कॉजवे किंवा बान्द्र्याच्या लिंकिंग रोडवरुन, फ़ॅशन स्ट्रीटवरुन स्वस्तात मस्त मिळणारे ढीगभर कपडे आणण्याची एका वयातली गरज. नुसते कपडेच नाही, पर्सेस, चपला, बेल्ट, जंक दागिने अनेक गोष्टी. तिथे जाऊन खरेदी करुन आलं की आपल्याकडे आता काय भारी वॉर्डरोब जमलाय, एकदम फ़ॅशनेबल असं मनाला समाधान वाटे जे जेमतेम आठवडाभर टिके. त्यानंतर मग कपाटात एकदा वापरुन बोळा झालेले स्कर्ट्स, रंग फ़िका पडलेले कुर्त्यांचे ढीग जमा होत. चपलांच्या कपाटात पाय ठेवायला जागा नाही पण ऐन वेळी कामाला येणार बाटाच्या दुकानातल्या दणकट चपलाच.
आई सांगून थकायची की बाई ग, मोजकेच पण चांगल्या क्वालिटीचे, शिवून घेतलेले कपडे असूदे जवळ. 
पुढे कालांतराने ते पटलं. ब्रॅन्डेड कपडे महाग वाटले तरी ते उत्तम टिकतात, त्यांची चमक कमी होत नाही. त्यात क्लासअसतो वगैरे. आता ब्रॅन्डेड कपडेही केवळ परवडतात म्हणून भारंभार आणणे सुरु झाल्यावर मात्र चक्र पुन्हा बिघडलं.  

डेनिसने तिच्या आजीचं फ़ॅशन स्टेटमेन्ट स्विकारलं. एखादा एकदम हटके दागिना, रेशमी स्कार्फ़, व्हिन्टेज ब्रोच, आगळ्या घडणीची अंगठी किंवा कानातले इतकंच पुरेसं असतं लक्षवेधी ठरायला. प्रत्येक लग्नात, समारंभाला वेगळी’, कोणी न बघीतलेली साडी किंवा नवा, महागडा ड्रेस अंगावर मिरवण्यापेक्षा ही युक्ती नक्कीच उपयोगाची.
---


No comments:

Post a Comment