Tuesday, March 14, 2017

सोपेपणाने जगणे कशाकरता?

नको त्या, अनावश्यक वस्तुंचा, कृतींचा पसारा अवतीभवती साठत गेल्यामुळे नेमके काय तोटे झाले किंवा होत आहेत तुमच्या रोजच्या आयुष्यात याबद्दलचे एक सर्वेक्षण तिशीच्या आतल्या तरुण-तरुणींमधे केले गेले जे डेनिसने आपल्या पुस्तकात मांडले आहे ती यादी धक्कादायक आहे- 

आयुष्य सोपेपणाने जगायचे त्यांनी नेमके का ठरवले या प्रश्नाची उत्तरे त्यातून मिळतात.

१) ठरवलेल्या ध्येयापासून लक्ष विचलित होणे- मेंदूची माहिती प्रोसेस करण्याची क्षमता आजूबाजूच्या क्लटरमुळे मंदावते. आपलं काम करण्याचं टेबल, अगदी साधा घरातला ओटा सुद्धा वस्तुंनी खचाखच भरला असेल, नको असलेला पसारा त्यावर असेल तर रोजच्या कामाचे शेड्युल गाठणंही कठीण जातं, मग वर्षभराच्या किंवा आयुष्यभराच्या ध्येयाचं काय?

२) क्लटर मुळे मेंदूवर ताण पडतो, अती प्रमाणात केलेल्या मल्टीटास्किंगमुळे सुद्धा हे होते.

३) दिरंगाई करण्याचे, चालढकल करण्याचे प्रमाण वाढणे- इतका पसारा झाला आहे की त्यात अजून थोडी भर पडण्याने काय होणार, नंतरच आवरु एकदम. किंवा झालाच आहे उशीर एखाद्या कामाला तर जरा अधिक झाला तर काय मोठं आभाळ कोसळणार आहे ही वृत्ती घातक आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याच्या मार्गातली सर्वात जास्त घातक.

४) प्रचंड प्रमाणात वेळेची आणि पैशाची नासाधूस- हवी असलेली महत्वाची वस्तु, कागद शोधण्याकरता ढिगारे पालथे घालण्याची वेळ आली की समजते वस्तु निटनेटक्या, पसारा आवाक्यात असण्याचे महत्व. बील सापडलेच नाही म्हणून उशिरा भरले जाणे, त्याकरता दंड, व्याज भरायला लागणे ही गोष्ट आपणही अनेकदा केली आहेच.

५) ऎलर्जीयुक्त आजारांचे प्रमाण वाढणे- उदा. अस्थमा, धुळीमुळे होणारे विकार,

६) वजन वाढणे- क्लटरमुळे स्ट्रेस हार्मोन्स विपरित प्रमाणात वाढून, जास्त प्रमाणात खाण्याचे प्रमाण वाढल्याने वजन अतिरिक्त वाढण्याचा विकार अमेरिकन्समधे गेल्या पन्नास वर्षात चाळीस पटीने वाढला. ऑर्गनायझिंग एक्सपर्ट पिटर वॉल्शने सिद्ध करुन दाखवले अनेक कुटुंबांच्या सर्वेक्षणाद्वारे, की ज्या कुटुंबांमधे अतिरेकी वस्तुंचा भरणा होता, त्या कुटुंबातल्या व्यक्तींमधे अतिरेकी खाण्याचे प्रमाण जास्त होते. वजन आणि जीवनशैलीचा संबंध फ़ार जवळचा आहे. तुमचं घर हे तुमच्या मानसिक आणि शारिरिक आरोग्याचे मोजमापक असते. आपलं आरोग्य, आपलं कुटुंब यावर त्याचा थेट परिणाम होणं साहजिक असतं जे न परवडणारे ठरते.

७) वर्तमानामधे सुखाने जगणे कठीण होते- अनावश्यक वस्तुंच्या साठ्यामधे बहुतांश वस्तु या आठवणीखातर, नॉस्टेल्जिया म्हणून जमा झालेल्या असतात. त्या तुम्हाला सतत भुतकाळाशी जखडून ठेवतात.

निटनेटक्या, आवरलेल्या, कमीतकमी सामान असणा-या घरात प्रसन्न, सकारात्मक वाटणे ही अत्यंत साधी, प्राथमिक प्राचीन, जगातल्या सर्व संस्कृतींमधे, जीवनशैलींमधे समान मानली गेलेली गोष्ट. 
जे घराचे तेच आयुष्याचे.

आवराआवर ही गोष्ट, पसारा कमीतकमी असणे, क्लटर नसणे ही गोष्ट जास्तीत जास्त नैसर्गिक जीवनशैलीच्या जवळ नेणारी आहे. निसर्गाशी स्वत:ला जोडलेले ठेवण्याकरता फ़ार काही आगळे वेगळे भव्य दिव्य करायची गरज नाही. फ़क्त पसारा आवरुन ठेवायला हवा. भोवतालातला आणि स्वत:च्या आतला.



No comments:

Post a Comment