Tuesday, March 14, 2017

’नाही’ म्हणण्याचे महत्व-

एक गोष्ट जी अनेक वेळा अनेकांनी सांगूनही ख-या अर्थाने वापरली जात नाही ती म्हणजे नाहीम्हणण्याचे महत्व-
नाही हा शब्द योग्य वेळी, योग्य ठिकाणी वापरता येणे हे आयुष्य साधे, सोपे करण्याच्या दृष्टीने, आतला, बाहेरचा तणाव, गुंतागुंत कमी करण्याच्या दृष्टीने किती महत्वाचा, जीवनावश्यक आहे ते तो प्रत्यक्ष वापरायला लागल्याशिवाय नाहीच कळत. 

नव्या वर्षाच्या कामाचं काटेकोरपणे केलेलं नियोजन का बारगळतं, अनेक नव्या योजनांचे संकल्प पुरे व्हायला कठीण नसतानाही अर्धवट का रहातात या मागचं एकमेव कारण म्हणजे नाहीम्हणायला न जमल्याने अनेक ऐनवेळी गळ्यात पडलेली कामं.

स्वानुभव सांगायचा तर ठरवलेल्या प्रोजेक्टवर काम चालू असतानाच मधेच एखादा लेख लिहिण्याचे काम अंगावर घेतल्याने, इंटरेस्टींग व्यक्तीची मुलाखत घ्यायचा चान्स मिळाल्याचा मोह आवरणे कठीण झाल्यामुळे माझे हातातले नियोजित प्रकल्प वर्षानुवर्ष रेंगाळले आहेत. कामे वेळेत पूर्ण न होणे, त्यामुळे ताण तणाव वाढणे.. आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे वाटायला हे पुरेसं असतं.

जी गोष्ट वस्तुंच्या बाबतीत तिच नातेसंबंधांच्याही खरी. 
खंडीभर बॉयफ़ेन्ड्स, मित्र मैत्रिणींची गर्दी अवती भवती करण्यापेक्षा मोजकेच, आयुष्य समृद्ध करणारे मित्र मैत्रिणी जोडणे, जे आहेत ते जपणे महत्वाचे मानणे. 
फ़ेसबुकसारख्या वर्चुअल जगामधेही तीन-चार हजारांची मित्रयादी मिरवण्याचा शौक, शेकडो ग्रूप्स जॉइन करण्याचा उत्साह कालांतराने ओसरतो. अशी मित्रयादी सांभाळणे कठीण. प्रत्येकाने सातत्याने अपडेट केलेली स्टेटसे, टाकलेले फोटो, ते आज कुठे जेवताहेत, कॉफ़ी पिताहेत, त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक घडामोडी, घटना ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात काडीचाही फ़रक पडणार नसतो, त्या जाणून घेण्यात आपले कित्येक तास खर्च होणार, प्रतिक्रिया नोंदवणे, आलेल्या उत्तराला प्रत्युत्तर देणे, त्यांच्या एका लाईकला उत्तर म्हणून सभ्यपणामुळे तुम्ही चार लाईकदेणे.. या सगळ्याला अंत नाही. 
प्रत्यक्ष आयुष्यातही हे तितकंच कठीण. इथेही आपले काही कमी ग्रूप्स जोडलेले नसतात. ऑफ़िसमधले, कॉलनीतले कमी म्हणून की काय शाळा-कॉलेजातलेही ग्रूप्स जे आता व्हॉट्सअप नावाच्या कटकटीमुळे पुन्हा तुमच्या आयुष्यात डोकावलेले असतात, एखादा रिडर्स क्लब असतो, जीममधला मित्रसमुदाय असतो, मॉर्निंग वॉकर्सचा ग्रूप असतो, भिशी असते, ट्रीप्स, प्रवासात ओळखी घट्ट झालेले असतात, जोडीदाराचे मित्र-मैत्रिणी तुम्हालाही चिकटलेले असू शकतात, ट्रेनमधले असतात.. रोजच्या आयुष्यातही अवती भवती भरपूर मित्र-मैत्रिणींची गर्दी असते ज्यातले खरे मित्र दोन टक्केही नसतात. इतरांशी संबंध राखण्याचा, घरी जाण्याचा, बोलावण्याचा, फोनवरुन विचारपूस करण्याचाही एक ताण असतो जो झेपत नसतो. 
नुसती ही गर्दी आजूबाजूला असण्याचाही तो ताण असतो.

एकटं पडण्याच्या भितीतून आपण आजूबाजूला ही गर्दी जमवलेली नाही ना याचा काटेकोर, स्पष्ट विचार करायला हवा. एकट्याने गोष्टी करण्यात, मग तो प्रवास असो, सिनेमा पहाणे असो, हॉटेलात जाणे असो.. आपल्याला सोबत हवीच हा मनाचा हट्ट कमी केला तर एकटेपणाने या गोष्टी करण्यात किती मोठा आनंद, शांतता आहे, सोपेपणा आहे हे सहज समजून येईल.

अनेक नाती, मैत्री टॉक्सिक झालेली असतात, चिघळलेली असतात.. ती बाळगून काही फ़ायदा नाही उलट तोटा असतो. जगण्यातले अनारोग्य वाढते त्यांच्यामुळे.   



No comments:

Post a Comment