Tuesday, March 14, 2017

द मिनिमलिस्ट

अतिरिक्त खरेदी न करण्याच्या, अनावश्यक वस्तु न साठवण्याच्या आव्हानात रोजच्या जीवनातल्या अनेक गोष्टींचा त्याग असतो ज्या एरवी निरुपद्रवी वाटलेल्या असतात पण ज्यांचा अतिरेक कर्जाच्या खायीत लोटणारा ठरलेला असतो. 
उदा. बाहेर जेवण्यावर पैसे न उधळणे, सिनेमा, बार्स, डिस्कोजवर खर्च न करणे, वीकेन्ड्सना भटकंती करण्यात पेट्रोल न जाळणे इत्यादी.. आणि अनेक गोष्टींचा स्विकार असतो, करमणुकीकरता सर्वांकरता खुले असणारे कार्यक्रम पहाणे, सार्वजनिक वहानाने प्रवास करणे, नवी पुस्तके विकत न घेता सार्वजनिक वाचनालयांमधून आणणे किंवा घरातली पुस्तके एकमेकांना वाचायला देणे.. 
अशा अनेक गोष्टी. काही जण ट्रेन किंवा बसचं तिकिट न काढता बायसिकल किंवा पायी चालणं स्विकारतात. मित्रांनी किंवा जवळच्या कुटुंबियांनीही त्यांचा खर्च उचलायचा नाही हे महत्वाचं. 

एका साध्या, मिनिमलिस्ट जीवनशैलीकडे घेऊन जाणारी ही सुरुवातीला खडतर वाटणारी ही वाट. प्रत्येकाची वेगळी.

मिनिमलिझम किंवा मिनिमलिस्ट जीवनशैलीचा स्विकार म्हणजे कमीतकमी, अत्यावश्यक गरजेच्या, स्वत:ला महत्वाच्या वाटणा-या वस्तुंसोबत जगणे. 
साधेपणाने जगण्याचे सूत्र सांगणा-या झेन तत्वद्न्यानाबद्दल आस्था असणा-यांना मिनिमलिझमबद्दल वेगळे सांगायची आवश्यकता नाही. 

मिनिमलिस्ट जीवनशैलीचा प्रसार गेल्या दहा-बारा वर्षांत इंटरनेट नियमाने वापरणा-या, उच्च मध्यमवर्गीय, यशस्वी करिअर जोपासणा-या, अतिरेकी खरेदी आणि उपभोगवादी जीवनशैलीच्या चक्रात अडकलेल्या ३० ते ४५ वयोगटातल्या अमेरिकन तरुण तरुणींमधे मोठ्या प्रमाणावर झाला त्यामागचे ट्रीगर होते जोशुआ बेकरचा द मिनिमलिस्टब्लॉग.

द मिनिमलिस्टहा ब्लॉग लिहिणा-या व्हर्मॉन्टच्या जोशुआ बेकरची गोष्ट सुरु झाली त्याने घरातला, गॅरेजमधला ओसंडून वहाणारा कचरा, वस्तुंची अडगळ साफ़ करायला काढण्याच्या दिवशी. 

ड्राइव्हवे वरचा प्रचंड मोठा ढिगारा पाहून जोशुआचा म्हातारा शेजारी त्याला सहज म्हणाला, “खरंच तुला या इतक्या गोष्टींची गरज होती का?” 

या प्रश्नाचे उत्तर शोधताना जोशुआचे पुढचे आयुष्य बदलून गेलं. 

आपल्या आयुष्यात या गोष्टींमुळे काहीही मौल्यवान भर घातलेली नाही, उलट अनेक मौल्यवान गोष्टी हिरावून घेतलेल्या आहेत असं त्याच्या लक्षात आलं. आणि मग जोशुआने नुसती अडगळच नाही तर घरातल्या इतरही अनेक वस्तु डोनेट, रिसायकल करायला सुरुवात केली. 
कमीतकमी वस्तुंसोबत जगण्याची मिनिमलिस्ट जीवनशैली जोशुआने जगायला सुरुवात केली आणि मग त्यातून मिनिमलिस्ट ब्लॉगर्स चळवळ सुरु झाली.

मिनिमलिझमम्हणजे सर्वसंगपरित्याग नाही. आजच्या जगात वावरताना कोणत्याही व्यक्तीला असे नि:संगपणे जगता येणं प्रॅक्टीकली अशक्य आहे. 
रोजच्या जगण्याला अत्यावश्यक अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. त्यांच्यासकट मिनिमलिस्ट जीवनशैली स्विकाराणे कितपत शक्य असते
असं अनेकांना वाटतं. म्हणूनच जोशुआ बेकर आजच्या काळातल्या मिनिमलिझमची व्याख्या सोप्या शब्दांमधे करतो. शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणं.” 
रोज ठरवून काही गोष्टी कमी केल्या, नवीन वस्तु आणण्यापेक्षा आहेत त्यांचाच नवा उपयोग शोधून काढला तर हे ध्येय बघता बघता साध्य होऊ शकतं.

मिनिमलिझम हे कोणतंही आधुनिक फ़ॅड नाही, त्याकरता कोणत्याही गोष्टींचा त्यागकरणे, कोणत्याही बंधनांमधे अडकवून घेणं अपेक्षित नाही. ही फ़क्त एक पर्यायी जीवनशैली आहे. करिअरच्या मागे धावत राहूनही ती जोपासता येते आणि मनात आलं तर पाठीवर संसार लादून जगभरात कुठेही, कधीही भटकंती करत जाता येऊ शकेल इतका सोपेपणा जगण्यात अपेक्षित असणा-यांनाही ती स्विकारता येते.

मिनिमलिस्ट जीवनशैली जगताना काहीजणांना स्वत:चं घर, कार, टीव्हीसेट या गोष्टी आवश्यक वाटू शकतात तर काही जणांना अनावश्यक. जोशुआने मिनिमलिझमची म्हणूनच काय टाकायचे किंवा काय स्विकारायचे याचा कोणताही उल्लेख आपल्या व्याख्येत करत नाही. 
त्याच्या मते मुळात स्वत:हून या जीबनशैलीकडे वळलेल्यांना अशा गोष्टींचं महत्व आपोआपच एका टप्प्यावर वाटेनासं होतं. मात्र तो टप्पा प्रत्येकाने आपापला ठरवायला हवा. 

जगताना मुक्तपणा, मोकळेपणा काणवायला हवा हे मिनिमलिस्ट जीवनशैलीचं मुख्य सूत्र. 
कसलीही भिती, असुरक्षितता, स्पर्धा, काळज्या, तणाव यापासून मुक्ती, अपराधभाव, नैराश्य जोपासणा-या ग्राहक-संस्कृतीच्या चंगळवादी जाळ्यात अडकून रहाण्यापासून मिळालेली मुक्ती.

घर-संसार व्यवस्थित सांभाळून, वस्तुंचा उपभोग घेऊनही मिनिमलिस्ट जीवनशैली जोपासता येतेच. फ़क्त त्या वस्तुंना, चैनीला स्वत:च्या आयुष्यात किती महत्व द्यायचे हे प्रत्येकाने स्वत: ठरवणं, आपले आरोग्य, नातेसंबंध, छंद, व्यक्तिमत्वाची जोपासना, एक व्यक्ती म्हणून आपली होणारी वाढ यापेक्षा या वस्तु मोठ्या आहेत का याचा निर्णय घेणं. 
माणूस हा भोवतालच्या पर्यावरणाचा, समाजाचा एक घटक आहे, आपलं आयुष्य जगताना त्यांचंही देणं आपण किती मानतो, फ़क्त स्वत:करता, स्वत:च्या कोषात गुरफ़टून घेत जगायचं की आजूबाजूच्या पर्यावरणाचा एक भाग होऊन जगायचं याचा निर्णय घेणं. 

आलिशान घर, कार हवीशी वाटते आहे? खुशाल जा आणि खरेदी करा. 
कुटुंबाकरता चैनीच्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? जा आणि आणा. 
करिअरच्या मागे धावायचं आहे? तसं करा. 
या गोष्टी तुम्हाला प्राधान्यक्रमाने गरजेच्या वाटत असतील तर नक्कीच करा. 
मात्र जाणीवपूर्वक, स्वत: विचार करुन या गोष्टींचा तुमच्या आयुष्यातला प्राधान्यक्रम ठरवा. 
ग्राहक-संस्कृती, जाहिराती यांच्या मा-याखाली दबून जाऊन, स्वत:ची विचारशक्ती हरवून, आपल्या आयुष्यातल्या सर्वात आनंद देणा-या इतर गोष्टींना डावलून हे करु नका इतकं साधं मिनिमलिस्ट जीवनशैलीचं सूत्र. 
जोशुआ बेकर आपल्या द मिनिमलिस्टब्लॉगद्वारा हे सूत्र आपल्या किंवा आपल्या मित्रांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनुभवांद्वारे मांडत जातो. त्याच्या ब्लॉगला अनेकांनी आपल्या स्वत:च्या अनुभवांच्या कड्या जोडून मिनिमलिझमची शृंखला बनवली आहे. 

जगताना आपले अनुभव, अडचणी, आनंद सगळं काही शब्दबद्ध करायचं ही एक महत्वाची, कदाचित एकमेव अशी अट आहे जोशुआने घातलेली. इतरांना आपल्या अनुभवातून प्रेरित करण्याकरता, शृंखला जोडली जाण्याकरता हे गरजेचं.

मिनिमलिस्ट जीवनशैली यशस्वीपणे जगणारे अनेकजण या ब्लॉग शृंखलेमधे वाचायला मिळतात. 

लिओ बबैता आपली पत्नी आणि सहा मुलांसहित आनंदाने मिनिमलिस्ट आयुष्य जगतो. सहा मुलांपैकी तीन त्याने दत्तक घेतलेली आहेत. 
जोशुआ बेकरची उत्तम करिअर आहे, उपनगरात प्रेमळ कुटुंबासोबत तो रहातो. कारही वापरतो. 
कॉलिन राईटजवळ आता फ़क्त ५१ वस्तु आहेत, त्यांच्यासोबत तिची जगभरात भटकंती चालते. त्या कमी करुन ३० वर आणायचं तिचं ध्येय आहे. कॉलिन आपल्या या भटकंतीवर आधारीत पुस्तकं, लेख लिहीते आणि पैसे कमावते. आणि मग पुन्हा नव्या भटकंतीवर निघते. 
टॅमी स्ट्रोबेल आपल्या नव-यासोबत एका अगदी चिमुकल्या घरात रहाते, ती कार वापरत नाही. 

हे सगळे म्हटलं तर वेगवेगळ्या त-हेचं आयुष्य जगतात पण जगताना मिनिमलिझमचं तत्व जोपासतात. गरजेच्या नाहीत त्या वस्तु घेत नाहीत, साठवत नाहीत आणि पर्यावरणाचं, नैसर्गिक स्त्रोतांचं जमेल तेवढं रक्षण करण्याचं ब्रीद जपतात. जोशुआ यालाच आयुष्यावरचा भार कमी करणे, जाडजुड टरफ़ल काढून टाकून आतला मूल्यवान गाभा जपणे म्हणतो. 
हा गाभा म्हणजे जगण्यातला आनंद, समाधान आणि पर्यायनिवडीचे स्वातंत्र्य.

मिनिमलिझमुळे जगणं कंटाळवाणं, एकसुरी होत नाही का असा अनेकांचा मनात येणारा प्रश्न.

जोशुआच्या मते मुळातच रोजच्या जगण्यातला अतिरिक्ततेचा, हव्यासाचा, उपभोगाचा, अडगळीचा रेटा ज्यांना नकोसा झाला आहे, ज्यांना तो दूर करुन जगण्याच्या निखळ आनंदावर लक्ष केंद्रीत करायचं आहे, जगण्यातून गडबड, कोलाहल काढून टाकायची आहे त्यांच्याकरताच ही जीवनशैली असल्याने या प्रश्नाचे वेगळे काही उत्तर संभवतच नाही. 

मिनिमलिझमचा अर्थ काहीजणांकरता स्वच्छता, टापटिप असू शकतो, काही जणांकरता ताणविरहित आयुष्य. 

मिनिमलिझमच्या अंतिम स्थानापर्यंत पोचण्याकरता प्रत्येकाचा मार्गही वेगळा. 
मात्र असे जगणे केव्हाही जास्त शाश्वत आणि निरामय, आरोग्यपूर्ण असते याबाबत मात्र सर्वांचेच एकमत.
  
मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे एखाद्या संन्यासी, फ़किरासारखं नि:संग जगणे नाही. अर्थात ज्यांना तसं जगायचं आहे त्यांना त्यातही आनंदच मिळत असतो, पण मिनिमलिझमचा तो हेतू नाही. 
यात फ़क्त जगण्यातला महत्वाचा, मौल्यवान गाभा मिळावा म्हणून भोवतालची अडगळ दूर करणे अभिप्रेत आहे, घरामधे, आयुष्यामधे आनंद सामावायला जास्तीत जास्त जागा उपलब्ध करुन देणे हा मुख्य हेतू. 
ही अडगळ नेमकी कोणती हे प्रत्येकाने ठरवायचे.


No comments:

Post a Comment