Tuesday, March 14, 2017

आठवणींचा पसारा सगळ्यात मोठा

आयुष्याचा अति वेग काढून टाकायचा, आपल्या अवती भवती साचलेल्या पसार्‍याला कमी करायचं त्याचा हा स्टार्टींग पॉइन्ट.

पसारा आहे, खूपच आहे ही भावना मुळात जन्मते ती नेमकी का आणि तिचे नक्की स्वरुप काय याच्या मुळाशी सहज जाता येत नाही. अनेक थर लागतात अधे मधे.
शरिरा-मनाभोवती खूप पसारा आहे, कोलाहल, कचर्‍यामधे आपण गुदमरतो आहोत ही जाणीव अस्वस्थ करणारी नक्कीच.
पसारा आहे हे मान्य केल्यावर मग पुढे काय? त्याकडे दुर्लक्ष करणे, तो नाहीच असे समजून वावरत रहाणे एका मर्यादेनंतर आपल्याला अशक्य झाले असते.
त्यावरचा पहिला उपाय म्हणजे तो आवरण्याचा प्रयत्न करणे, नजरेसमोरुन नाहिसा करण्याचा प्रयत्न करणे.

नव्या वर्षाच्या संकल्पामधे सोशल मिडिया डी-ऎडिक्शन, नेट टाईम कमीतकमी करण्याचा संकल्प यावेळी पहिल्या क्रमांकावर होता.
त्याला लगेचच छेद दिला गेला कारण कचरा नियोजनबद्धरित्या कमी कसा करायचा याच्या टीप्स खात्रीलायक रित्या नेटवरच मिळण्याची खात्री.

घरात सगळ्यात जास्त पसारा, गोंधळ असणारे, किंवा तो आहे असं कायमच वाटणारे ठिकाण म्हणजे आपले कपड्यांचे कपाट. मुळावर घाव घातला की बाकी सोपं या विचारानी लगेच ते आवरायला घेतले.

कपाटात खूप गोष्टी आहेत, गरजेपेक्षा कितीतरी जास्त. त्या कधीच वापरल्या जाणार नाहीयेत ही मनाच्या एका कोप-यात सदैव जिवंत असणारी टोचणी ठळक होत जाते.
साड्यांचे अनेक फ़ोल्डर्स. लग्नात घेतलेल्या, अजूनही रेशिम, जरी, रंग धड असलेल्या पण आपण पुढच्या आयुष्यात कधीही नेसणार नाही माहित असलेल्या साड्या, ऎन्टिक पदाला पोचलेली आजेसासूबाईंची विरलेली पैठणी, मंगळागौरीत हौसेने घेतलेली, पुन्हा घडीही न उलगडलेली नौवारी, काही नारायण पेठी, चंदेरी, पटोला.. जागा अडवून बसलेल्या, या साड्यांचे कुशन कव्हर्स, पडदे वगैरे बनवून त्यांचा पुनर्वापर करायचे डू इट युअरसेफ़ (डीआयवाय) व्हिडिओज लॅपटॉपमधे साठवून ठेवलेले आहेत.
आयुष्यात कधीतरी खूप वेळ असेल तेव्हा नक्की करायच्या अनेक गोष्टींपैकी ही एक.
काही शिफ़ॉन, गार्डन, कलकत्ता, माहेश्वरी, कोटा, कोशा, नल्लीतल्या, जयपूरच्या, चेन्नईच्या. प्रदर्शनांमधून घेतलेल्या, बनवून घेतलेल्या, लग्नांच्या वाढदिवसांच्या, भेट मिळालेल्या.. प्रत्येकाकरता पेटीकोट ब्लाउजेस.. त्याचेही आता दोन-तीन सेट. न होणारे, होणारे, नव्या स्टाईलचे. त्यात रेडिमेडचीही भर.
मग ओढण्या, स्टोल्स. चुडीदार, सलवार, पतियाळा, लेगिन्ग्जचे ढीग, कुर्ते, ट्युनिक्स, टॉप्स, जीन्स, ट्राउझर्स, स्कर्ट्स. दागिने.. सोने, चांदी, प्रेशस-सेमी प्रेशस स्टोन्स, बीड्स, जन्क, कॉस्च्युम,..

अत्यंत सिस्टीमॅटीकली वॉर्डरोब, किचन रॅक्स, पुस्तकांची कपाटं लावणं ही एक कला आहे.
वापरात नसलेल्या वस्तु निर्दयपणे टाकून देणे जमवायला लागते त्याकरता.

न होणारे, वजन कमी-जास्त होईल तेव्हा घालू म्हणून ठेवून दिलेले, आठवणीखातर ठेवलेले कपडे काढून टाकणे, जुन्या सवयीच्या, प्रेमाने घेतलेल्या, दिलेल्या वस्तु फ़ेकून देणे सोपे नाही.

आठवणींचा पसारा सगळ्यात मोठा आणि त्या पसा-याचा भारही.
आवरायचा प्रयत्न करतानाच कळत जातं आपल्या आवरशक्ती बाहेरचा आहे हा पसारा.
हा सगळा कचरा आपण निर्माण केलेला आहे, आपणच आपला पैसा, वेळ, उर्जा खर्च करुन जमा केलेला आहे. या वस्तु ना धड गरजेच्या, ना धड अडगळीच्या. अस्वस्थता वाढतच जाते.

हे सगळं गरजेचं आहे, फ़ेकून द्यावसं वाटत नाही याचाही एक ताण.

नुकत्याच आवरुन झालेल्या वॉर्डरोबमधे आता भरपूर जागा झालेली आहे.
मन किंचित हलकं झालेलं असलं तरी मनावर ताण अजूनही आहे.
जागा रिकामी झाली की त्यात नव नवी भर पडत रहाणारच आहे हे माहित असण्याचा ताण. रिकाम्या झालेल्या जागा दुप्पट वेगाने भरुन निघतात हा नियम आहे.
माहिती, वस्तू जमवायच्या, साठवून ठेवायच्या, फ़ेकून द्यायच्या, पुन्हा जमवायच्या ही नशा असते आणि त्यातून बाहेर पडावसं वाटलं तरी पडता येत नाही.


No comments:

Post a Comment