Tuesday, March 14, 2017

’मिनिमारिसुतो’

जीवनशैली संदर्भात मिनिमलिझमची पाश्चात्य चळवळ अलिकडे सुरु झालेली असली तरी एकंदरीत कला-संस्कृती आणि सामाजिक इतिहासात मिनिमलिस्ट या संकल्पनेची मुळं खोलवर गेलेली आहेत. विशेषत: जपानी, झेन संस्कृतीमधे या मुळांचा मागोवा घेता येतो. 

मिनिमारिसुतोहा शब्द जपानी संस्कृतीचा जुना वारसा. आर्ट, डिझाईन, लिटरेचरच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा. पारंपरिक जपानी घरे मिनिमारिसुतो संकल्पनेला मध्यवर्ती ठेवूनच बांधण्यात आलेली, म्हणजे एक खोली अनेक कारणांकरता वापरणे इत्यादी.

अर्थात मध्यमवर्गीय भारतीय संस्कृतीमधे गेल्या काही वर्षांमधे काटकसर, वस्तुंचा पुनर्वापर या संकल्पना जशा कालबाह्य झाल्या तसाच काही दशकांपूर्वी सर्वसाधारण जपानी कुटुंबांमधे मिनिमारिसुतोअडगळीत गेला. जपानच्या नव्या पिढीला जास्तीत जास्त वस्तु खरेदी करण्याचे वेड लागले आणि घरात त्या साठवून ठेवायचेही.
मात्र आता गेली काही वर्षे जपानमधे पुन्हा कमीत कमी वस्तु जवळ बाळगणे, अडगळमुक्त जीवनशैली, शून्य कचरा निर्मितीअशा अर्थाने मिनिमारिसुतोसंकल्पनेचं पुनरुज्जीवन झालं. 
जपानी माध्यमांमधून आता सातत्याने मिनिमारिसुतो जीवनशैलीवर कार्यक्रम होतात. अडगळीवाचून जगणेहा आनंदनिधानाकडे जाण्याचा मार्ग असल्याचे जपानी लोकांना पुन्हा पटवणे हा माध्यमांचा प्रमुख उद्देश आहे आणि तो हळू हळू यशस्वी होत आहे.

लोकांच्या बदललेल्या दृष्टीकोनाला कारणूभूत ठरलं आहे मारी कोन्दो या जपानी लेखीकेने २०१४ साली लिहिलेले द लाईफ़ चेन्जिन्ग मॅजिक ऑफ़ टायडिंग अप- द जॅपनिज आर्ट ऑफ़ डीक्लटरिंग ऎन्ड ऑर्गनायझिंगहे पुस्तक. 
अलीकडेच याच मालिकेतले दुसरे पुस्तक आले आहे- स्पार्क जॉय”.

मारी कोन्दोच्या या दोन्ही पुस्तकांच्या अमेझॉनवर वीस लाखांहून जास्त प्रती विकल्या गेल्या, आणि त्या जास्तीत जास्त जपानी लोकांनीच विकत घेतल्या आहेत. 

मारी कोन्दोच्या मते तिने आपल्या पुस्तकांमधून नवीन काहीच सांगीतलेले नाही, फ़क्त घर आवरण्याच्यापारंपरिक जपानी व्यवस्थेचे ज्याला कोनमारी पद्धतअसे नाव आहे तिचे पुनरुज्जीवन केले.

घर आवरणे, नको असलेल्या वस्तू फ़ेकून देणे, कपडे, वस्तू, पुस्तकांची व्यवस्था.. घरातला मोकळा
अवकाश जपून ठेवणे, अडगळ दूर करणे याकरता जपानमधे वापरली जाणारी पारंपरिक कोनमारी पद्धत मारी कोन्दोमुळे आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

घर आवरणे ही संकल्पना जपानमधल्या जुन्या घरांमधून पुष्परचना आणि पाककृतींप्रमाणे पिढयान पिढ्या जपलेली कला. मात्र अलिकडच्या अनेक वर्षांमधे जपानी विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातल्या लहान मुलांवर घर आवरण्याचे हे कोनमारीसंस्कारच झाले नसल्याने हळू हळू ती पद्धत विस्मरणात गेली, कालबाह्य झाली. त्यात भर पडली पाश्चात्य पद्धतीने बांधलेल्या घरांच्या आधुनिक रचनेमुळे.
वर्ष अखेरीला घर आवरणे ही जपानची पारंपरिक पद्धत. आता वर्ष अखेरीला वस्तुंची नवी खरेदी होऊन अडगळीत भर घातली जाते.

जपानी मिनिमलिझम म्हणजे घराच्या मुख्य दिवाणखान्यात, लिव्हिंग रुममधे काहीही सामान नसणे. जास्तीत जास्त मोकळा अवकाश हे प्रमुख सूत्र. घरांमधे भिंती घालून वेगवेगळ्या खोल्यांमधे त्याचे विभाजन करणे म्हणजे मुक्त अवकाशाला प्रतिरोध असे मानले जाते.

वीस-तीस वर्षांपूर्वी जपानी घरांमधे फ़क्त तातामी चटया अंथरलेल्या असत, त्यांच्यावरच बसणे, झोपणे, आरामात पसरणे, झोपणे सहज शक्य असे. मात्र आधुनिक, नव्या जपानी घरांमधे हार्डवुडची जमीन असते. त्यावर सोफ़ा, खूर्च्या, रग्ज इत्यादी शिवाय बसणे, झोपणे शक्य होत नसल्याने नव्या पिढीला केवळ तातामीचा वापर नव्याने करणे आव्हानात्मक वाटते.

जपानमधे देव हा केवळ निसर्गातच नाही तर घरातल्या वस्तुंमधेही असतो अशी प्राचीन श्रद्धा आहे.
या श्रद्धेनुसार जपानी लोकं काहीही कच-यात न फ़ेकता प्रत्येक वस्तुचा पुनर्वापर करण्यावर भर देतात. मात्र आता आधुनिक जपानी लोकांना पुनर्वापराकरता वेळ मिळत नाही, पण वस्तु टाकून देण्याचे संस्कार पूर्णपणे जातही नाहीत आणि त्यात नवनव्या वस्तु विकत घेण्याचा मोह.

लेखीका मारी कोन्दो वयाच्या पाचव्या वर्षापासून जपानच्या पारंपरिक कोनमारी पद्धतीने घर आवरण्यात तरबेज झाली त्याचे कारण तिचे आजी आजोबा. 
मारी कोन्दोचं लहानसं घर अत्यंत सुंदर आणि टापटीपीचं म्हणून परिसरात प्रसिद्ध होतं. शेजारी पाजारी घर आवरण्याकरता मारी कोन्दोचा सल्ला ती अगदी लहान वयाची असल्यापासुन घेत. जपानमधे वर्ष अखेरीला घर संपूर्ण आवरण्याची, अडगळ काढून टाकण्याची परंपरा आहे. मारी कोन्दो त्या वेळी अत्यंत बिझी असे. सल्ला देण्यातून तिला उसंत मिळत नसे.
घराच्या सौंदर्य रचनेपेक्षा घराची सुव्यवस्था राखणे जास्त महत्वाचे हे तिचे तत्व. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने व्यावसायिक पातळीवर घर आणि ऑफ़िसेस आवरण्याचे सल्ले देण्याचं काम सुरु केलं. 

कोन्दोच्या मते लोकांना योग्य प्रकारे घर आवरणे जमत नाही कारण त्यांना घरातली अडगळ काढून टाकणे जमत नाही. घरातल्या वस्तुंमधे त्यांची फ़ार मोठी भावनिक गुंतवणूक असते. फोटो, पेनं, मासिके, पुस्तके, कात्रणे, कपडे, अंतर्वस्त्रे, मेकपचं सामान, भांडी, काचवस्तू अशा किमान लाखभर वस्तू मारी कोन्दो कोणत्याही मध्यमवर्गीय घरातून बाहेर काढते. काही वेळा तर हा कचराटनावारी असतो.
लोकांच्या घरातल्या अतिरिक्त वस्तुंची अडगळ बाहेर काढून, अवजड फ़र्निचर काढून टाकून रुग्णालयात दाखल होण्याची वेळ अनेकदा तिच्यावर येते.

एखादी फ़ुलदाणीही घरातून बाहेर टाकायला नाखूश असणारी लोकं मारी कोन्दोचं का ऐकतात
मारी कोन्दोच्या मते ती लोकांना हे पटवून देऊ शकते की या वस्तू तुमच्या घरात अडगळीत पडून राहिल्याने गुदमरतात, मृतावस्थेत जगत असतात, इतर कोणा गरजू व्यक्तीच्या घरी त्या जिवंतराहू शकतात. 
थोडक्यात मारी कोन्दो अडगळीच्या वस्तूंना नवीन जीवन बहाल करते. 

लोकांच्या घरातून बाहेर काढलेल्या अडगळीला योग्य घरे मिळवून देण्याचे काम मारी कोन्दो वैयक्तिक जबाबदारीने करते. त्याकरता ती गराज सेल आयोजित करते, जुन्या बाजारांमधे खेपा घालते, चॅरिटी शो, प्रदर्शने भरवते. मात्र अगदीच तुटक्या वस्तू असल्याशिवाय ती कोणत्याही जुन्या अडगळीतल्या वस्तु डम्पिंग ग्राउन्डवर टाकत नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने ते योग्य नाही असं ती मानते.

कोणतीही अतिशयोक्ती न करता ती ठामपणे सांगते की अशा त-हेने घर आवरल्यावर त्या घरातल्या लोकांच्या आयुष्यातही नाट्यपूर्ण फ़रक पडलेला आहे. त्यांची अनेक वर्षे खोळंबलेली कामे पार पडतात, आयुष्यभर जपलेली स्वप्ने पूर्ण होतात, नोकरी-व्यवसायात यश मिळतं, नातेसंबंध सुधारतात, लोकांची आयुष्य जास्त आनंदपूर्ण बनतात. आणि हे फ़क्त त्यांच्या आजूबाजूचा अवकाश मोकळा केल्याने शक्य होतं. घरातली कोंदट हवा मोकळी होऊन तिथे ताज्या, स्वच्छ हवेचा वावर होतो.
अशा मोकळ्या, खुल्या, अडगळ विरहित अवकाशात त्यांना विचार करायला, लक्ष केन्द्रीत करायला, नव्या कल्पना सुचायला वाव मिळतो. ते तणावमुक्त होतात. त्यांची कार्यशक्ती वाढते. 

घर आवरल्याने विस्कळीत विचारही आवरले जातात, भुतकाळ मागे टाकून वर्तमानावर लक्ष केन्द्रित व्हायला मदत होते. आयुष्यात काय गरजेचे आहे, काय हवे, काय नको हे नीट कळायला लागते.
निसर्गाशी एकात्मता साधायची तर अवकाश शक्य तितका मोकळा असायला हवा, आपल्या उपयोगी पडणा-या, आपल्याला आनंद देणा-या वस्तुंनाही मोकळा श्वास घेता यावा इतका अवकाश त्यांच्या भोवती असावा. त्यांच्यासोबत वैयक्तिक नातं जोडण्याकरता ते गरजेचं आहे.

मारी कोन्दो घर कसे आवरायचेयाचे प्रशिक्षण वर्गही घेते. तिच्या वर्गात नाव नोंदवायला तीन महिन्यांचा वेटींग पिरियड असतो इतकी गर्दी होते. जपानपधील मोठमोठ्या उद्योगधंद्यांमधे तिच्या कार्यशाळा भरतात. मारी कोन्दो मजेनी म्हणते की माझे सेलेब्रिटी स्टेटस लोकांच्या घरातली अडगळ दूर करुन प्राप्त झालेले आहे. कोनमारी पद्धतीने घर आवरल्यावर ते पुन्हा कधीही विस्कटणार नाही, त्यात अनावश्यक वस्तू साठणारच नाहीत याची मारि कोन्दो हमी देते.

तिच्या मते नुसते घर कसे आवरायचे हे सांगीतल्याने लोकांची आयुष्य नाट्यपूर्ण बदलत नाहीत. घर कसे आवरायचे हे फ़क्त एक तंत्र नसते. ती कला आहे. प्रत्येक वस्तुची एक जागा असते, तिथेच ती ठेवल्याने त्या वस्तुचा सन्मान होतो. वस्तु आवरुन, योग्य जागी ठेवण्याची पद्धत तिने इतक्या सोप्या तर्हेने विकसित केली आहे की घरातले सहा वर्षांचे मुल सुद्धा यात तरबेज होते. 
नुसत्या तंत्रावर भर न देता, मानसिकता बदलण्यावर ती भर देते. 
आणि मानसिकता कशी बदलायची? तर योग्य तंत्र वापरुन. 
हा खरं तर विरोधाभास पण कोन्दो त्याचा अचूक वापर करते.

घर किंवा तुमची कामाची जागा तुम्ही स्वत: आवरली तरच ती नीट राहू शकते यावर तिचा विश्वास आहे. इतर कोणालाही, नोकर, एजन्सीज मधून आलेली माणसे यांच्याकडून हे काम करवून घेतले तर त्याचा उपयोग नाही कारण ते पुन्हा पुन्हा विस्कळीत होत रहाते, वस्तु साठून रहातात आणि यात तुमची प्रचंड उर्जा, वेळ, पैसा फ़ुकट जात रहातो.

मी जन्मजात आळशी आहे, किंवा मला पसाराच आवडतो, मला वेळ मिळत नाही अशी विधाने ही स्वत:मधल्या कमतरतेवर पांघरुण घालणारी असतात असं म्हणत मारी त्यांना काहीही महत्व देत नाही.

पिढीजात पाककृती किंवा स्वयंपाकाची कौशल्ये जशी एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हस्तांतरीत होतात तसेच हे जपानी घर आवरण्याचे कोनमारी तंत्र. मात्र नव्या पिढीला आता ते अशा त-हेने शिकवावे लागते याची कोन्दोला खंत वाटते.

स्पार्क जॉयया आपल्या दुस-या पुस्तकामधे तिने भर दिला झेन संकल्पनेवर. ही संकल्पना मुळातच साधेपणावर आधारीत असल्याने मिनिमलिझमला त्यात खूपच महत्व आहे. 

जगण्याचा आनंद आणि मुक्तपणा हा साधेपणातून, नैसर्गिकपणातून येतो. 
याबद्दल अधिक माहिती पुढच्या लेखात.

  


No comments:

Post a Comment