Thursday, July 13, 2017

दिवस- दुसरा

रोज तीन वस्तु ’टाकून देणे’ या शब्दप्रयोगा ऐवजी ’देऊन टाकणे’ असा बदल अरुंधती देवस्थळीने सुचवला तो मला पटला. खरं तर मी काढलेल्या वस्तु शब्दश: कचरापेटीमधे टाकून देण्याकरता बाजूला काढणार नाही आहे हे नक्की. पण तसं अभिप्रेत होणेही चूक आहे.
एखाद्याला गरजूला, ज्याला या वस्तुंचा उपयोग आहे त्याला देणे हा अग्रक्रम, त्यानंतर त्या रिसायकल करता येतील का विचार महत्वाचा आहे. तो मी नक्कीच करणार आहे.

आजच्या दुस-या दिवशी अजून तीन वस्तु (तीन या संख्येमधे साधारण तीन कॅटेगरी असं अपेक्षित आहे. अर्थात प्रत्येक वेळी त्यात एकापेक्षा जास्त वस्तु असतीलच असं नाही) बाजूला काढणे मला अर्थातच फ़ार जड गेले नाही. सध्या आजूबाजूला नजर फ़िरवली, कपाट उघडलं तरी पटकन कळतय काय मला नको आहे, काय माझ्याकडे अतिरिक्त आहे. त्यामुळे सोपं जाणार आहेच. खरी अडगळ नजरेआड आहे पण तिकडे बघायला सध्या माझ्याकडे फ़ार वेळ नाही. हातात जास्त कामे आहेत.

तर आजच्या वस्तुंबद्दल

१) कुकी कटर- हे मला एका नातेवाईक गृहिणीने मोठ्या प्रेमानी दिले. अर्थात मी कधीच कुकीज वगैरे घरी करण्याच्या भानगडीत पडले नव्हते, पडणारही नाही याची त्यांना कल्पना नसावी. त्यांनी तरीही ते मलाच का दिले हेही माहित नाही. गेली अनेक वर्षं ते तसंच्या तसं माझ्या किचन ड्रॉवरमधे पडून आहे. कोणी कितीही प्रेमाने काही देऊ केलं तरी जर तुम्हाला त्या वस्तुचा काहीच उपयोग नसेल तर भीड पडू न देता ’नको’ असे सांगायला हवे हा लहानसा धडा यातून शिकता येईल. अर्थात धडे शिकणे या बाबतीत मी मुळातच इतकी ड आहे की ते फ़ार माझ्या बाबतीत फ़ार शक्य व्हायचे नाही. तुम्ही बघा.


२) लिपस्टीक्स/नेलपेंट्स
एकेकाळी मला अक्षरश: वेड होतं या दोन गोष्टींचं. मी त्या भरमसाठ घ्यायचे. माझ्याकडे लिपस्टीक्स/नेलपेंट्सचं सुंदर कलेक्शन होतं. वापरायचे कमी. त्यातल्या त्यात लिपस्टीक्स जास्त वापरल्या जायच्या. पण बहुतेकदा त्याच त्याच शेड्स. नव्या, घेताना आकर्षक दिसलेल्या, जास्त ग्लॉसी, शिमर असलेल्या किंवा फ़िक्या शेड्स तशाच्या तशा पडून असायच्या. मग एक्स्पायरी डेट संपलेली असली तरी त्या तशाच. आता माझं हे वेड ऑलमोस्ट संपलय. मी आवडत्या शेड्सच्या दोन किंवा तीनच लिपस्टीक्स आणि अगदी मोजकी नेलपेंट्स जवळ ठेवते. मुलींना फ़ार आवडतच नाही त्या वापरायला. असं असलं तरी कॉस्मेटीक बॉक्समधे अजूनही ’साठा’ तयार होतोच. जुन्या झालेल्या मी वेळीच टाकून दिल्या नाहीत म्हणूनही. तर आज आधी त्या बाजूला काढल्या.



३) चायनीज टी डिस्पेन्सर्स
माझा नवरा कामानिमित्ताने खूप वेळा चीनला जातो. काहीवेळा मीही जाते. मला ग्रीन टी खूप आवडतो. त्यामुळे हे डिस्पेन्सर्स माझ्याकडे सारखे जमा होतात. अनेकदा मैत्रीणींना भेट देऊनही उरतात. काही वापरलेले असतात त्यामुळे देता येत नाहीत. तर त्यातले काही बाजूला काढले आहेत.



कालच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून अजूनही काही मैत्रिणी यामधे सामिल झाल्या आहेत. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

1 comment:

  1. गेल्या महिनाभर स्टुडिओचे नूतनी करण चालू आहे त्यातच तुमची ही पोस्ट आवडली आणि कामाला आली , काही जुनी पेपर स्केचेस मित्रांसाठी काढून ठेवली , श्रीलंका येथून मातीचा लॅम्पशेड खूप सांभाळून आणली पण वापरली नाही 2 वर्षे , मित्र म्हणाला दे , पॅक करून ठेवली , तव्याचे घड्याळ बरेच वर्षे वापरले , आता द्यावेसे वाटतेय ! जीव अडकलेल्या गोष्टी तुमच्यामुळे आनंदाने दूर सारत्या आल्या !हे सगळे श्रेय आपल्या सर्वांचे !

    ReplyDelete