Tuesday, July 11, 2017

दिवस पहिला

सर्वात जास्त साठणारी वस्तु म्हणजे अर्थातच कपडे. तेव्हा पहिला मोर्चा तिकडे वळवला.
मिथिला, माझी मोठी मुलगी कामानिमित्त एक वर्षाकरता परदेशी गेली आहे. तिचे काही जुने कपडे तिने जाताना मला ’टाकून दे’ असं सांगीतलं होतं. पण माझा आळशीपणा. त्यामुळे मी ते नीट बॅगेत ठेवून बॅग नीट कपाटाच्या खालच्या कप्प्यात सारुन ठेवली. अजूनही कामी कपडे त्यात टाकून मग सगळे एकत्र टाकू वगैरे त्यामागे विचार. पण आता सहा महिने झाल्यावरही ती बॅग तिथेच होती. तेव्हा पहिली वस्तु लगेच मिळाली.
जुन्या कपड्यांची बॅग.




मी प्लास्टीकच्या बाटल्या, डबे, जार्स फ़ार वापरत नाही. पण काहीवेळा रिकाम्या झालेल्या (विशेषत: गोवर्धन तुपाच्या) बाटल्या चांगल्या फ़ूडग्रेड प्लास्टीकच्या आणि आटोपशीर आकाराच्या असल्याने त्यात काहीतरी ठेवलं जातं. पण तेवढ्यापुरतंच. मग त्या मी बाजूलाच कपाटाच्या एका कोप-यात सारुन ठेवते. माझ्याकडच्या काही काचेच्या चांगल्या बाटल्यांची झाकणे खराब झाली होती. ती नवी आणून त्या बाटल्या, बरण्या पुन्हा वापरायचं मनात होतं. पण ते काही झालं नाही. आता मी त्यातल्या अगदी आवश्यक तेवढ्याच बाजूला ठेवून उरलेल्या सगळ्यांची टाकून द्यायच्या लॉटमधे भरती केली.



तिसरी वस्तुही सहज मिळाली. जुन्या शॉपिंग बॅग्ज आणि पर्सेस. ठराविकच वापरल्या जातात आणि बाकिच्या अनेक धूळ खात खणात एकात एक घातलेल्या पडून होत्या. काही पर्सेस आता पावसाळ्यात वापरु म्हणून ठेवलेल्या, पण त्या फ़ार वापरायच्या अवस्थेत नाहीत असं लक्षात आलं. तेव्हा त्यातल्या ब-याचशा उचलल्या आणि टाकून द्यायच्या लॉटमधे सरकवल्या.



आता उद्या काय टाकता येईल याकरता आजूबाजूला बघते आहे. भरपूर काय काय दिसतय. 

5 comments:

  1. चला... मी पण लागते कामाला.

    ReplyDelete
  2. टाकून दयायच्या म्हणजे फेकून दयायच्या ? कि कुणाला तरी वापरता येतील अस बघा व ? मिनिमलिझम च्या या वाटेवर चालतांना हा देखील एक अडथळा आहे यावर काय विचार करताय ते ही सांगा

    ReplyDelete
    Replies
    1. वैशाली, तो शब्दप्रयोग चुकीचाच आहे. ज्यांना अधिक उपयोग आहे त्यांना देणे, पुनर्वापर करणे या गोष्टी अग्रक्रमावर ठेवणे महत्वाचे आहे. पुढच्या पोस्टमधे सुधारणा केली आहे. धन्यवाद.

      Delete
  3. आपल्या गरजा (अत्यावश्यक आणि विनाकारण वाढविलेल्या) काय आहेत हे आधी समजुन घेतले पाहिजे. कोणताही अतीरेक होता कामा नये. वस्तू घरातून काढुन टाकताना गरजवंताला मिळावी असा विचार चांगला. घरातील पसारा कमी करण्यासाठी कोंडाळ्यात फेकु नये.

    ReplyDelete